नवी दिल्ली : आयपीएलमधील कामगिरी राष्ट्रीय संघासाठी निवड होण्यास एकमेव मापदंड होऊ शकत नाही; मात्र दिनेश कार्तिक आणि राहुल तेवतिया यांनी आपापल्या फ्रॅन्चायजींसाठी फिनिशर्सची भूमिका बजावीत आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी चार महिने शिल्लक आहेत. त्या दृष्टीने खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करणे ही निवडकर्त्यांची जबाबदारी असेल.
पुढील महिन्यात द. आफ्रिका संघ भारतात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होईल. आधुनिक क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका मोलाची ठरते. भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करू शकणारे फिनिशर्स हवे आहेतच. फिटनेसच्या मुद्द्यावरून हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाने मागच्या वर्षीच्या विश्वचषकानंतर मधल्या फळीत दीपक हुड्डा आणि व्यंकटेश अय्यर यांचा प्रयोग करून पाहिला; मात्र दोघेही विश्वासास पात्र ठरू शकले नव्हते.
हार्दिकने आयपीएलमधील पुनरागमनात दमदार कामगिरी केली; शिवाय राष्ट्रीय संघाचा दावेदार म्हणून स्वत:ला सज्जदेखील केले. हुड्डा आणि हार्दिक आपापल्या संघांसाठी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करीत आहेत. राष्ट्रीय संघात या दोघांची वर्णी लागल्यास त्यांना मधल्या फळीतच खेळावे लागणार आहे. यंदा व्यंकटेश आयपीएलमध्ये माघारला. त्यामुळे फिनिशर्सच्या यादीत तो तळाच्या स्थानावर घसरला. भारतीय संघात जडेजाला फिनिशर संबोधले जाते. आता कार्तिक आणि तेवतिया यांची भर पडली. तेवतियाने अशक्य स्थितीतही सामना खेचून आणण्याची ख्याती मिळविली आहे. २००४ ला भारताकडून पदार्पण करणारा कार्तिक हा पुन्हा एकदा भारतीय संघात परतण्याच्या निर्धाराने खेळताना दिसतो.
माजी राष्ट्रीय निवडकर्ते एमएसके प्रसाद यांच्या मते कार्तिक आणि तेवतिया हे नऊ जूनपासून द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेदरम्यान नक्की खेळतील. हार्दिकला देखील पुनरागमनाची संधी मिळू शकेल. हार्दिक, जडेजा, कार्तिक आणि तेवतिया हे चार जण फिनिशर्सच्या भूमिकेत असतील. कार्तिकने देशासाठी टी-२० प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हार्दिक ऑस्ट्रेलियात संघाचा मुख्य खेळाडू असू शकेल. मी त्याला नियमित गोलंदाजी करताना पाहू इच्छितो. आम्हाला ऑस्ट्रेलियात अष्टपैलू कामगिरीची गरज असेल.
हार्दिक हा टायटन्ससाठी नियमित गोलंदाजी करीत नसला तरी त्याने आतापर्यंत २० षटके टाकली शिवाय चौथ्या स्थानावर धावा काढत आहे.निवड समितीत प्रसाद यांचे सहकारी राहिलेले सरनदीपसिंग म्हणाले,‘दावेदारी सिद्ध करण्यासाठी हार्दिकला नियमितपणे गोलंदाजी करावी लागेल. संघात तुम्ही केवळ फलंदाज म्हणून खेळू शकणार नाही. कार्तिकला देखील संघात स्थान मिळू शकते. मात्र त्यासाठी त्याला फलंदाज म्हणून खेळावे लागेल. यष्टिरक्षणासाठी ऋषभ पंत आहेच. कार्तिकला अनुभव असल्याने त्याची दावेदारी भक्कम वाटते. पाठोपाठ फलंदाज बाद झाले तर कार्तिकला भूमिका बदलायची कशी हे चांगले ठाऊक आहे. तेवतियाने देखील आयपीएलमध्ये धडाका दाखविला. पण, ऑस्ट्रेलियात कामगिरीची पुनरावृत्ती करेल, याबद्दल माझ्या मनात शंका आहे.