नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी करुण नायरला संघातून डच्चू देण्यात आला. यावरून निवड समिती, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर सडकून टीका झाली. पण आता कोहलीने या टीकेला उत्तर दिले आहे. करुणला संघातून बाहेर काढण्यात माझा हात नाही, असे स्पष्टीकरण कोहलीने दिले आहे.
करुणने पहिल्याच मालिकेत त्रिशतक झळकावले होते. पण गेल्या दीड वर्षांपासून तो संघाबरोबर असला तरी त्याला खेळण्याची संधी दिली नाही. आतातर संधी न देता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या गोष्टीमुळे कोहलीने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता.
याबाबत कोहली म्हणाला की, " संघ निवडणे हे माझे काम नाही. निवड समिती हे काम करत असते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने संघ निवडला आहे. भारतीय संघातून करुणला बाहेर काढण्यात आले असले तरी त्यामध्ये माझा कुठलाही प्रकारचा सहभाग नाही."