Indian Cricketer in County Championship : इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. २५ जानेवारी ते ११ मार्च या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरूद्ध इंग्लंड अशी पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारताकडून पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव यातून माघार घेतली आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे, मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वीच एक भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. हा खेळाडू एकेकाळी संघाचा भाग होता आणि त्याने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक त्रिशतकही झळकावले होते. तो खेळाडू म्हणजे करुण नायर.
करुण नायर एप्रिल-मे महिन्यात नॉर्थम्प्टनशायर काउंटीकडून खेळणार आहे. या दोन महिन्यांत तो या काउंटीसाठी सात काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळणार आहे. गेल्या वर्षीही या कौंटीने शेवटच्या तीन सामन्यांसाठी नायरला विकत घेतले होते. या तीन सामन्यांमध्ये त्याने ७८, १५० आणि २१ धावा केल्या होत्या. तो त्या संघात पृथ्वी शॉ च्या जागी खेळणार आहे, कारण त्या काळात पृथ्वी शॉ IPL मध्ये व्यस्त असेल.
भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा नायर हा दुसरा फलंदाज आहे. नायरने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत ही ऐतिहासिक खेळी खेळली होती. डिसेंबर 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 धावा केल्या होत्या. आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे त्रिशतकात रूपांतर करणारा तो पहिला खेळाडू आहे. कौंटी प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनी नायरबद्दल निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मोसमात नायरने खेळलेल्या तीन डावांत केवळ धावाच केल्या नाहीत तर त्याच्या शांत आणि उत्कृष्ट स्वभावाने त्याने एक वेगळी छाप सोडली. नायरचा संघात पुन्हा समावेश केल्याने आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.
नायर बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने मार्च २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याने भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. जवळपास सात वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. नायर बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. पण यशस्वी होऊ शकलेला नाही. IPL मध्येही तो सतत अपयशी ठरताना दिसला आहे. त्यामुळेच त्याला IPL 2024 लिलावात कोणाही विकत घेतले नाही.