नवी दिल्ली : त्रिशतक झळकावूनही संघाबरोबर जवळपास दीड वर्ष करुण नायरला पर्यटक म्हणून ठेवले. संधी न देता करुणला संघातून डच्चू दिला. पण संघाबाहेर काढताना निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी मात्र बेताल वक्तव्य केले आहे. करुणने रणजी स्पर्धेत धावा कराव्या, असं म्हणत त्यांनी करुणला बाहेरचा रस्ता दाखवला. पण आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याला संधी का दिली नाही आणि त्याला कोणत्या गोष्टीच्या आधारावर संघातून बाहेर काढण्यात आले, याचे उत्तर मात्र प्रसाद यांना देता आलेले नाही.
मार्च २०१७ साली करुण अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर मात्र त्याला आतापर्यंत एकही सामना खेळवला नाही. इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाज हाराकिरी करत असताना करुणला खेळण्याची संधी देण्यात आली नाही. त्याच्या नंतर संघात आलेल्या हनुमा विराहीला संघात स्थान देण्यात आले, पण करुणला मात्र संधी नाकारण्यात आली. गेल्या दीड वर्षांपासून करुणला एकदाही का संधी दिली गेली नाही, याचे उत्तर प्रसाद यांनी देणे सोयीस्कररीत्या टाळले आहे.
याबाबत प्रसाद म्हणाले की, " करुणला जेव्हा संघात स्थान न देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर मी त्याच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर रणजी आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याला खेळण्यास सांगितले आहे. संघाची निवड करताना करुणचे नाव चर्चेत आले होते, पण जेव्हा अंतिम संघ निवडायचा झाला तेव्हा त्याचे नाव मागे पडले. "