लाहोर : भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकापासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. काश्मीर प्रांत आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्याचा इतिहास आहे. त्यात काश्मीरमधील काही फुटीरवादी नेत्यांनाही पाककडून फुस लावली जात आहे. त्यामुळे येथील परिस्थिती नेहमीच तणावजन्य असते. या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. त्याने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे.
काही महिन्यांपूर्वी आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावरून पाकिस्तान सरकारलाच घरचा आहेर दिला होता. तो म्हणाला की,'' पाकिस्तानला काश्मीर नकोय. तो भारतालाही देऊ नका. काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवंय. जेणेकरून माणुसकी जीवंत राहिल. तेथील लोकांना नरकयातना भोगण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानला खरचं काश्मीर नकोय.. त्यांना चार प्रांत सांभाळता येत नाहीत.''
आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात याच मुद्याचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की,''काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.''
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या आफ्रिदीनं पाकिस्तानकडून 398 वन डे सामन्यांत 8064 धावा केल्या आहेत आणि त्यात 6 शतक व 39 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर वन डेत 395 विकेट्सही आहेत. 27 कसोटी सामन्यांत त्याने 1716 धावा केल्या असून 48 विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: Kashmir belongs to the Kashmiris, Not to Indians,Not to Pakistanis; say Shahid Afridi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.