Join us  

मंजिले भी जिद्दी है...लेकिन बुलंद है हौसले! क्रिकेटप्रती मुलींची समर्पण वृत्ती

असीम फाउंडेशन आणि व्हिक्टर फोर्सतर्फे आयोजित पुणे आणि काश्मीर या दोन संघांमधील क्रिकेट सामन्यासाठी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मुलींचा संघ शनिवारी पुण्यात दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 9:18 AM

Open in App
ठळक मुद्दे'मी सध्या जम्मू आणि काश्मीरच्या संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. लॉकडाऊनमुळे सराव पूर्णपणे थांबला होता. ऑक्टोबरपासून सरावाला सुरुवात झाली.'रुबिया सैद अतिशय आत्मविश्वासाने बोलत होती!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : प्रत्येक वेळी आपल्याला हवी ती गोष्ट मिळेलच असे नाही...सुविधा नाहीत, प्रशिक्षण नाही अशा तक्रारी करत राहण्यापेक्षा आपल्यातील कौशल्य धार देत ते तळपण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त महत्वाची...स्वतःवर अढळ विश्वास आणि पालकांचा पाठिंबा असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करता येते...'इसलीए हमारी लडकियों के हौसले बुलंद है'...रुबिया सैद अतिशय आत्मविश्वासाने बोलत होती!

असीम फाउंडेशन आणि व्हिक्टर फोर्सतर्फे आयोजित पुणे आणि काश्मीर या दोन संघांमधील क्रिकेट सामन्यासाठी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मुलींचा संघ शनिवारी पुण्यात दाखल झाला. त्यावेळी त्यांनी काश्मीरमधील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती, क्रिकेटप्रती मुलींची समर्पण वृत्ती, पालकांचा पाठिंबा अशा विविध विषयांवर 'लोकमत' प्रतिनिधीशी दिलखुलास गप्पा मारल्या. अनेक खेळाडू पहिल्यांदा राज्याबाहेर आल्या आहेत. त्या येथील अनुभव तिथे जाऊन शेअर करतील, त्यातून आणखी मुलींना प्रेरणा मिळेल, संवाद होईल, असा आशावाद तिने व्यक्त केला.

रुबिया सैद म्हणाली, 'मी सध्या जम्मू आणि काश्मीरच्या संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. रणजी ट्रॉफीसाठी तसेच भारतीय संघासाठीही खेळले आहे. अनंतनागमधील धरमिंदर यादव यांनी असीम फाउंडेशनबरोबर क्रिकेट सामन्यासाठी जायचे आहे असे ठरले. राज्यातून चार-पाच संघांशी संपर्क साधला आणि टीम तयार झाली. लॉकडाऊनमुळे सराव पूर्णपणे थांबला होता.ऑक्टोबरपासून सरावाला सुरुवात झाली.'

'मेट्रो शहरांमध्ये क्रिकेटचे खूप प्रोत्साहन मिळते. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती थोडी वेगळी आहे. हिमवृष्टी सुरू असेल तर खेळ, प्रवास सगळे ठप्प होते. तिथे खाजगी प्रशिक्षण संस्था नाहीत, व्यवसायिक प्रशिक्षण, सुविधाही फारशा नाहीत. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतील तर दोन दिवस आधी मुलींना एकत्र बोलावले जाते, ट्रायल घेतली जाते आणि टीम तयार होते. मात्र, मुली जिद्दी आहेत आणि स्वतःला सातत्याने सिद्ध करत आहेत. या प्रवासात पालकांचा पाठिंबा आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.' काश्मीरमधील नागरिकही इतर देशवासीयांप्रमाणेच आहेत, त्यांनाही इतरांसारख्या भावना आहेत, दैनंदिन व्यवहार आहेत, याकडे तिने लक्ष वेधले.

सना शौकतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. ती म्हणाली, 'पहिल्यांदा खेळण्यासाठी राज्याबाहेर आलेय. पुण्यातील राहणीमान, वातावरण छान आहे. माझे वडीलही बरोबर आले आहेत. पुढील शिक्षणही  पुण्यात घेण्याचा विचार आहे.'

टॅग्स :पुणे