इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या क्षणाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद केले. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात RCB ने दणदणीत विजय मिळवून सरस नेट रन रेटच्या जोरावर CSK ला स्पर्धेबाहेर फेकले. यंदाचे पर्व सुरू होण्यापूर्वी फ्रँचायझीने ऋतुराज गायकवाडला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ७ सामने जिंकले. CSK च्या फॅन्सनीही ऋतुराजला कर्णधार म्हणून स्वीकारले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याचा चाहत्यांना राग आला. यावरूनच CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी अप्रत्यक्षपणे MI ला टोमणा मारला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या यू ट्युब चॅनेलवर विश्वानाथन यांची मुलाखत पोस्ट केली. यात त्यांनी कर्णधारबदलाचा निर्णय कसा घेतला गेला यावर प्रकाश टाकला. “मला वाटते की CSKच्या चाहत्यांनी MS Dhoni नंतर कर्णधार म्हणून ऋतुराजला स्वीकारले, कारण धोनीने त्याची निवड केली होती. संघ व्यवस्थापनाने त्याची कर्णधार म्हणून निवड केली. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, CSK च्या व्यवस्थापनाने क्रिकेटच्या बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे ऋतुलाही मदत झाली, कारण संघ व्यवस्थापनाकडून आलेल्या सूचना त्याच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी धोनीवर होती. मला विश्वास आहे की तो भविष्यातही चांगली कामगिरी करेल,” असे विश्वनाथन यांनी सांगितले.
त्यांच्या विधानातील हस्तक्षेप या वाक्याचा नेटिझन्सनी संदर्भ मुंबई इंडियन्सच्या मालकांशी लावला आहे. विश्वनाथन यांना असे वाटले की, व्यवस्थापनाच्या गैर-हस्तक्षेपाने फ्रँचायझीला नेहमीच मदत मिळाली आहे. कर्णधारपदाचे दडपण असतानाही ऋतुराजने कशी कामगिरी केली याबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “कर्णधारपदाच्या दबावाचा त्याच्यावर परिणाम झालेला नाही. आम्ही भविष्यात CSK साठी त्याच्या योगदानाची अपेक्षा करतो. दबाव खूप जास्त आहे कारण तो महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून काम करतोय. कोणीही त्याच्याशी बरोबरी करू शकत नाही, परंतु MS ला आत्मविश्वास होता की ऋतुराजमध्ये खूप चांगले काम करण्याची क्षमता आहे. ''