Kaviya Maran Preity Zinta: IPL 2022 स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामासाठी सारेच खेळाडू कसून तयारी करत आहेत. बरेचसे भारतीय आणि परदेशी खेळाडू विविध देशात कसोटी मालिकांमध्ये खेळत आहेत. यंदाच्या हंगामासाठी महिन्याभरापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव (Mega Auction) घेण्यात आला. या लिलावादरम्यान संघमालक आणि त्यांचे सल्लागार यांनी अत्यंत चलाखीने एक-एक खेळाडू आपल्या संघात दाखल करून घेतला. काहींनी आपले जुने खेळाडू सोडले तर काहींनी नवे खेळाडू विकत घेतले. यातच यंदाच्या लिलावात चर्चेत राहिलेल्या काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने एक खेळाडू सोडला. तो खेळाडू प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्ज (PBKS) संघाने विकत घेतला. आणि त्याच खेळाडूने नुकतेच एक धडाकेबाज शतक ठोकले.
IPL 2022 Mega Auction च्या आधी SRHने भरपूर खेळाडूंना करारमुक्त केलं. त्यानंतर लिलावादरम्यानही SRHने काही खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे इंग्लंडचा दमदार सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow). तो गेल्या हंगामापर्यंत SRH कडून खेळत होता. पण यंदा त्याला पंजाब किंग्स संघाने ६.७५ कोटींच्या किमतीला विकत घेतलं. आता IPL जवळ येत असताना हाच स्टार सलामीवीर जॉनी बेअरस्टो तुफान फॉर्मात असून त्याने बुधवारी शानदार शतक ठोकलं.
वेस्ट इंडिज विरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील मधल्या फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टो याने संघाचा डाव सावरत शानदार शतक झळकावलं. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम फलंदाजीस सुरूवात केली. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने त्यांची अवस्था ४ बाद ४८ अशी झाली होती. त्यावेळी बेअरस्टोने झुंजार खेळी केली. आधी बेन स्टोक्ससोबत ६७ तर बेन फोक्ससोबत ९९ धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने एक बाजू लावून धरली आणि नाबाद १०९ धावा केल्या. यात खेळीत त्याने १७ चौकार लगावले.