Setback to Kavya Maran SRH: IPL 2025 च्या आगामी हंगामासाठी सर्व संघ कसून तयारी करत आहेत. खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझी अनेकविध क्लृक्तांचा वापर करताना दिसत आहेत. या साऱ्या रणधुमाळीत सनरायझर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने SRH संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२१ पासून सनरायझर्स हैदराबाद संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता, परंतु त्याने आता फ्रेंचायझी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेनच्या ( Dale Steyn ) देखरेखीखाली संघाची कामगिरी अत्यंत उत्तम झाली होती. गेल्या वर्षी SRH संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, अंतिम सामन्यात त्याचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. असे असूनही डेल स्टेनने आता SRH ला सोडचिठ्ठी दिली आहे.
डेल स्टेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
स्टेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. X वर पोस्ट करता त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे आभारी असल्याचे लिहिले. SRHने मला IPL मध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी दिली. मात्र, मी आगामी हंगामात परतणार नाही. मी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या SA20 मध्ये सनरायझर्स इस्टर्न केप संघासोबत काम करत राहीन. संघाला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असे त्याने लिहिले.
डॅनियल व्हिटोरी संघाचा मुख्य प्रशिक्षक
सध्या सनरायझर्स हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी आहे. आगामी हंगामासाठी फ्रँचायझी कोणत्या खेळाडूला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करेल? हे आता पाहणे खूपच मनोरंजक झाले आहे. स्टेनने घेतलेल्या माघारीमुळे नव्या खेळाडूंसाठी हे आव्हान असेल.