Kavya Maran Sunrisers Hyderabad Retention List: IPL 2025 साठी सर्वच संघांची रिटेन्शन लिस्ट काही दिवसात दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून रिटेन्शनबाबत काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील हंगामात, हैदराबादने पॅट कमिन्स वर मोठी रक्कम खर्च केली होती. पण यावेळी मात्र एक वेगळाच खेळाडू 'भाव' खाऊन जाणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेनसाठी हैदराबाद मोठी रक्कम खर्च करण्यास तयार आहे. क्लासेनने गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे क्लासेनवर जास्त पैसे खर्च करून कमिन्सच्या मानधनात कपात होण्याची दाट शक्यता आहे.
एका अहवालानुसार, हेनरिक क्लासेनला संघात ठेवण्यासाठी संघ १८ कोटी रुपयांच्या टॉप स्लॅबपेक्षाही २७.७% वर जाण्यास इच्छुक आहे. क्लासेनला पहिले रिटेन्शन म्हणून २३ कोटी रुपये देण्यास SRH चा संघ तयार असल्याची माहिती मिळत आहे. असे झाल्यास क्लासेन हा मिचेल स्टार्कनंतर IPL मधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनू शकतो. गेल्या मोसमात KKRने सुमारे २५ कोटी रुपये देऊन स्टार्कचा संघात समावेश केला होता. तर पॅट कमिन्सला २०.५० कोटींना SRH ने संघात घेतले होते. यावर्षी मात्र त्याला १८ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवण्यासाठी मनधरणी करण्यात येणार आहे, असे बोलले जात आहे.
रिटेन्शनमध्ये 'हा' असेल तिसरा खेळाडू!
युवा खेळाडू अभिषेक शर्मालाही कायम ठेवण्यात येणार असल्याचे याच रिपोर्ट अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या मोसमात अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. त्याला १४ कोटींची मोठी रक्कम देऊन संघात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा झंझावाती सलामीवीर फलंदाज ट्रेव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनाही संघात ठेवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. पण त्याबाबत अद्याप ठोस माहिती नाही.
दरम्यान, क्लासेनला निर्धारित स्लॅबपेक्षा जास्त पैसे का दिले जातील? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र १८ कोटींपेक्षा जास्त दिलेली रक्कम संघाच्या पर्समधून वजा केली जाईल, असा नियम आहे.