इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. पॅट कमिन्सला कर्णधार करण्याचा संघ मालकिण काव्या मारनच्या निर्णयाची सर्वांनी खिल्ली उडवली होती. पण, भारतीय भूमित ऑस्ट्रेलियाला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कमिन्सने त्याची निवड योग्य ठरवली. भारतीय खेळपट्टीची जाण कमिन्सला आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला. पण, वनिंदू हसरंगाच्या माघारीमुळे SRH ला धक्का बसला होता. मात्र, त्यावरही फ्रँचायझीने तोडगा शोधला आहे आणि युवा प्रभावशाली गोलंदाज संघात घेतला आहे.
महाराज यादवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियमवर आज पंजाब किंग्स व हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक असतील. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामन्यांत दोन सामने जिंकले आहेत. SRH च्या संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga ) हा आयपीएल २०२४ मध्ये भाग घेणार नाही. SLCने बीसीसीआयला पत्र लिहून सांगितले आहे की, ''२६ वर्षीय खेळाडूला डाव्या पायाचा घोटा बरा करण्यासाठी पुनर्वसन आणि विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे तो आयपीएल २०२४ हंगामासाठी उपलब्ध नसेल. दुबईतील वैद्यकिय तज्ञाने त्यांला विश्रांतीचा सल्ला दिला होता.''
१०.७५ कोटी किमत असलेल्या हसरंगाला RCB ने रिलिज केल्यानंतर लिलावात हैदराबादने १.५ कोटीच्या मूळ किंमतीत त्याला संघात घेतले होते. त्याच्या जागी आता हैदराबादने श्रीलंकेचा २२ वर्षीय विजयकांथ वियास्कांथ ( Vijaykanth Viyaskanth ) याची निवड केली आहे. ५० लाखांच्या किमतीत त्यांनी ही डील केली आहे. विजयकांथने श्रीलंका प्रीमिअऱ लीग गाजवली होती. तो गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या श्रीलंकेच्या संघाचा भाग होता आणि तो एक सामना खेळला ज्यामध्ये त्याने चार षटकांत १-२८ अशी कामगिरी केली. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.