Team India : ट्वेटीं २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ अमेरिकेत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या सुपर फिनिशरने अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू केदार जाधवने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३९ वर्षीय केदार जाधवने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. केदारने फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आता त्याने थेट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने सोमवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. ३ जून पासून केदार जाधवने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याचे म्हटलं आहे. केदार जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्यांच्या कारकिर्दीतील फोटोंचा एक स्लाइड शो देखील शेअर केला, ज्यामागे किशोर कुमार यांचे गाणे वाजत होते.
"माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील प्रेम आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वांचे आभार. ३ वाजल्यापासून मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असे मानले पाहिजे," असे केदार जाधवने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केदार जाधवने २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. केदार जाधवने २०१४ ते २०२० दरम्यान भारतासाठी ७३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १०१.६० होता. केदार जाधवने एकदिवसीय सामन्यात २ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. जाधवने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. केदार जाधव २०१९ चा विश्वचषक खेळला होता आणि उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाचाही भाग होता. २०२० मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलमधील करिअर
केदार जाधवने आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून शेवटचा आयपीएलचा सामना खेळला होता. केदार जाधव त्या काळात जिओ सिनेमासाठी मराठी कॉमेंट्रीही करत होता. आयपीएलमध्ये केदार जाधव आरसीबी,चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळला होता. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत, केदार जाधवने ९५ सामने खेळले आणि १२३.१४ च्या स्ट्राइक रेटने १२०८ धावा केल्या. आता तो मराठी कॉमेंट्रीमध्येच करिअर करण्याचा विचार करत आहे.