Join us

Kedar Jadhav: 21 चौकार आणि 12 षटकार! केदार जाधवचा रूद्रावतार; ठोकले वादळी द्विशतक 

kedar jadhav double centurie: केदार जाधवने महाराष्ट्राकडून खेळताना आसामविरूद्ध वादळी शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:08 IST

Open in App

मुंबई : केदार जाधव एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीचा नियमित सदस्य होता. मात्र, वेळ कधी कोणाला संधी देईल आणि कोणाला डच्चू देईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असेच काहीसे या मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या बाबतीत झाले. केदार जाधवला भारतीय संघामधून अचानक वगळण्यात आले आणि आता त्याची आयपीएल कारकीर्द देखील जवळपास संपली आहे. कारण त्याला आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये कोणत्याही फ्रॅंचायझीने खरेदी केले नाही.

केदार जाधवचे द्विशतक मात्र, केदार जाधव आयपीएलच्या मिनी लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर देखील चर्चेत आला आहे. खरं तर रणजी ट्रॉफी 2022-23 च्या एलिट ग्रुप बी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. या सामन्यात आसामच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात अवघ्या 274 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात महाराष्ट्राने केदार जाधवच्या द्विशतकाच्या जोरावर मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने 147 षटकांपर्यंत 9 बाद 594 धावा केल्या. केदार जाधवने 100च्या स्ट्राईक रेटने 283 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 21 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. 283 चेंडूत 283 धावांची त्याची खेळी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 

आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी तो फ्लॉप ठरल्याने त्याला मिनी लिलावाच्या यादीतून वगळण्यात आले होते. कारण तो 405 खेळाडूंच्या यादीतही नव्हता आणि त्यामुळे यावेळी कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. यावेळी त्याची मूळ किंमत 1 कोटी ठेवली होती. लक्षणीय बाब म्हणजे केदार जाधव 2019च्या विश्वचषकाच्या संघाचा भाग होता. 

क्रिकेटपासून होता दूर केदार जाधव मागील 3 वर्ष क्रिकेटपासून दूरच आहे. भारताकडून 2020मध्ये त्याने अखेरचा वन डे, तर 2017मध्ये अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू होता, परंतु दुखापत, खराब फॉर्म यामुळे महेंद्रसिंग धोनीनेही त्याला CSK तून दूर केले.  डिसेंबर 2018 मध्ये केदारने छत्तीसगडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर आज त्याने प्रथम श्रेणीत द्विशतकी खेळी केली. भारताकडून 73 वन डे सामन्यांत 42.09च्या सरासरीने 1389 धावा अन् ट्वेंटी-20 त 9 सामन्यांत 122 धावा करणाऱ्या केदारची फटकेबाजी पाहून आज चाहते खूश झाले. वन डेत त्याच्या नावावर 27 बळींची नोंद आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

  

टॅग्स :रणजी करंडककेदार जाधवमहाराष्ट्रआसाम
Open in App