Kedar Jadhav ipl । मुंबई : केदार जाधव एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीचा नियमित सदस्य होता. मात्र, वेळ कधी कोणाला संधी देईल आणि कोणाला डच्चू देईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असेच काहीसे केदार जाधव या मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या बाबतीत झाले. केदार जाधवला भारतीय संघामधून अचानक वगळण्यात आले आणि आता त्याची आयपीएल कारकीर्द देखील जवळपास संपली आहे. कारण त्याला आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये कोणत्याही फ्रॅंचायझीने खरेदी केले नाही. खरं तर हा मराठमोळा क्रिकेटपटू मागील 12 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मात्र, आता त्याने नवी इनिंग सुरू केली असून तो आयपीएलमध्ये मराठी भाषेत समालोचन करताना दिसणार आहे.
दरम्यान, मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव आयपीएलच्या 16व्या हंगामात मराठीतून समालोचन करणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे केदारने प्रथमच आपला मोर्चा समालोचनाकडे वळवला आहे. आयपीएल 2023 ची सुरूवात होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील सलामीचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. खरं तर आगामी आयपीएल हंगामात एकूण 12 भाषांमध्ये समालोचन होणार आहे. यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी, ओरिया, बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे.
मराठीतून समालोचन करणारे शिलेदार -केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, प्रसन्न संत, चैतन्य संत, कुणाल दाते, विकत पाटील, पूर्वी भावे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"