बंगळुरु - भारतीय संघातून खेळणारा महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधवला आयपीएलच्या लिलावात चांगली किंमत मिळाली. अष्टपैलू कौशल्य असलेल्या केदारची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने केदारला 7.8 कोटी रुपयांना विकत घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही जाधवच्या जमेच्या बाजू आहेत. मधल्याफळीत फलंदाजी करणारा केदार जाधव गरज असताना फटकेबाजी करु शकतो आणि प्रसंगी उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी करतो.
केदार जाधव मूळचा पुण्याचा असून टीम इंडियाकडून खेळताना त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. केदार जाधवने 37 एकदिवसीय सामन्यात 797 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
नऊ टी-20 सामन्यात केदारच्या 122 धावा असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. केदार याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोच्ची टस्कर्स या संघाकडून खेळला आहे.