- अयाज मेमन, नरेंद्र माेदी स्टेडियमवरुन
अहमदाबाद : ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी हिंदीत म्हण आहे. वन डे विश्वचषकात भारत - पाकिस्तान लढतीची उत्सुकता ‘एव्हरेस्ट’सारखी शिगेला पोहोचली होती. मात्र, शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या साक्षीने रोहित शर्माच्या भारतीय संघाने पाकिस्तानची एकतर्फी लढतीत ७ गडी राखून धूळधाण केली. यासह विश्वचषकात ३१ वर्षांत आठव्यांदा विजयी घोडदौड कायमही राखली. पाकिस्तानचा ४२.५ षटकांत १९१ धावांत धुव्वा उडविल्यानंतर विजयी लक्ष्य ११७ चेंडू आधी ३०.३ षटकांत ३ बाद १९२ असे गाठले.
आजच्या लढतीदरम्यान पाक संघात प्रतिभा कमी नव्हती, पण त्यांच्यात विजयाचा संकल्पच जाणवला नाही. सुरूवातीपासूनच भितभित खेळणाऱ्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना स्वत:वर हावी होण्याची संधी देऊन टाकली. संधीचा लाभ घेत शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा करत २-२ गडी बाद केले. अवघ्या ३६ धावांत पाकने आठ फलंदाजांचा सहज बळी दिला.
शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांची दांडी गुल करणारा ‘लोकलबॉय’ जसप्रीत बुमराहने ७ षटकांत केवळ १९ धावा दिल्या. रिझवानला त्याने टाकलेला एक चेंडू तर ‘बॉल ऑफ द मॅच’ होता. अर्थात ‘सामनावीर’ तोच ठरला.
त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकणारा कर्णधार रोहित शर्माने ८ चौकार आणि ६ षटकारांसह ६३ चेंडूत ८६ धावा कुटल्या. रोहितने षटकारांची आतषबाजी केली तर पाकचे फलंदाज एकेका धावेसाठी संघर्ष करत होते. विशेष असे की, त्यांच्या डावात एकही षटकार लागला नाही. कर्णधार बाबर आझमच्या अर्धशतकी खेळीचा अपवाद सोडल्यास एकही फलंदाज स्थिरावू शकला नाही. कमी धावसंख्येचा बचाव करण्यासाठी सुरूवातीच्या दहा षटकांत एक-दोन गडी बाद करणे क्रमप्राप्त असते, मात्र भारतीय फलंदाजांनी त्यांना कुठलीही संधी दिली नाही. इतका एकतर्फी सामना होईल, असे कधीही वाटले नाही. ‘भारताच्या माऱ्यापुढे पाकचा संघ मेणासारखा वितळला,’ असेच म्हणावे लागेल. पाकिस्तान संघाची अशीच वाटचाल राहिल्यास प्रवास फार पुढे होईल, असे वाटत नाही.
दुसरी सर्वोत्तम कामगिरी
सर्वांत कमी धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचे ८ बळी घेण्याची भारतीय गोलंदाजी ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.
३४ धावांत विरुद्ध वेस्ट इंडीज, २०११ विश्वचषक
३६ धावांत विरुद्ध पाकिस्तान, २०२३ विश्वचषक
वनडेमध्ये पाकिस्तानी डावाचे अध:पतन
३२ धावांत ८ बळी गमावले विरुद्ध वेस्ट इंडीज, केपटाऊन १९९३ (२ बाद ११ वरून सर्वबाद ४३)
३३ धावांत ८ बळी गमावले विरुद्ध श्रीलंका, २०१२ (२ बाद १६६ वरून सर्वबाद १९९)
३६ धावांत ८ बळी गमावले विरुद्ध भारत, अहमदाबाद, २०२३ (२ बाद १५५ वरून सर्वबाद १९१)
विश्वचषक २०२३ चे ‘सिक्सर किंग’
१४ - कुशल मेंडिस (श्रीलंका)
११ - रोहित शर्मा (भारत)
८ - क्विंटन डिकॉक (द.आफ्रिका)
६ - रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
६ - डेरिल मिचेल (न्यूझीलंड)
खेळाडू धावसंख्या पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक पायचीत गो. सिराज २० २४ ३/० ८३
इमाम-उल-हक झे. राहूल गो. हार्दिक ३६ ३८ ६/० ९४
बाबर आझम त्रि. गो. सिराज ५० ५८ ७/० ८६
मोहम्मद रिझवान त्रि. गो. बूमराह ४९ ६९ ७/० ७१
सौद शकील पायचीत गो. कुलदीप ०६ १० ०/० ६०
इफ्तिखार अहमद पायचीत गो.कुलदीप ०४ ०४ १/० १००
शादाब खान त्रि. गो. बूमराह ०२ ०५ ०/० ४०
मोहम्मद नवाझ झे. बूमराह गो. हार्दिक ०४ १४ ०/० २८
हसन अली झे. शुभमन. गो. जडेजा १२ १९ २/० ६३
शाहीन शाह आफ्रिदी नाबाद ०२ १० ०/० २०
हारीस रौफ पायचीत गो. जडेजा ०२ ०६ ०/० ३३
खेळाडू धावसंख्या भारत
रोहीत शर्मा झे. इफ्तिखार गो. शाहीन ८६ ६३ ६/६ १३६
शुभमन गील झे. शादाब गो. शाहीन १६ ११ ४/० १४५
विराट कोहली झे. नवाज गो. हसन १६ १८ ३/० ८८
श्रेयस अय्यर नाबाद ५३ ६२ ३/२ ८५
लोकेश राहूल नाबाद १९ २९ २/० ६५
Web Title: Keep burning in 31 years, now the score is 8-0!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.