सिडनीभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट ही ऑस्ट्रेलियाच्या विजायासाठी अतिशय महत्वपूर्ण असेल, अशी प्रांजळ कबुली यजमान संघाचा आघाडीचा गोलंदाज पॅट कमिन्सने दिली आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय, तीन टी-२० तर चार कसोटी सामने खेळणार आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे.
'प्रत्येक संघामध्ये एक किंवा दोन असे फलंदाज असतात की त्यांची विकेट मिळवणं प्रतिस्पर्धी गोलंदाजचं लक्ष्य असतं. यात बहुदा संघाच्या कर्णधारांचा समावेश असतो. जसे की इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि भारताचा विराट कोहली. तुम्हाला या फलंदाजांना लवकर बाद केलंत तर तुम्ही सामना जिंकू शकता', असं कमिन्स म्हणाला. विराटची विकेट खूप मोठी विकेट आहे. त्यामुळे त्याला शांत ठेवणं हाच आमच्या विजयाचा मंत्र असेल, असंही तो पुढे म्हणाला.
पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यूएईवरुन आयपीएल स्पर्धा खेळून परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे ११ खेळाडू सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. पॅट कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळताना दिसला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी सिडनीत होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला संपुष्टात येणार आहे.