कोलकाता: 'खेळाडूंनी खेळाचा आनंद घेणे शिकायला हवे. जर दडपण सहन करू शकणार नसाल तर क्रिकेट खेळणे थांबवा. देशाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूला दबावाऐवजी अभिमान वाटायला हवा, असा सल्ला देताना १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी परखड मत मांडले.
खेळाडूंच्या मानसिक दडपणाबद्दल आणि त्यावर व्यक्त केलेल्या मतांमुळे त्यांना चाहत्यांनीदेखील फटकारले; पण कपिल स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या मते, दबाव हा 'अमेरिकन' शब्द असून, तो त्यांनी सोयीनुसार वापरला. ज्या खेळाडूंना आयपीएल खेळताना किंवा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना दडपण जाणवते त्यांनी पूर्णपणे क्रिकेट खेळणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कपिल संतापून म्हणाले, 'केळी विका केळी, नाही तर अंडी" ज्या खेळाडूंना दडपण सहन होत नाही त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढताना कोलकाता येथील एका कार्यक्रमात लांबलचक भाषणात ते पुढे म्हणाले, खेळाडूंनी केळीचा स्टॉल उघडावा किंवा अंडी विकण्यासाठी एखादे दुकान थाटावे. दबाव सहन न करणाऱ्या खेळाडूंना मी तरी कधीच खेळाडू म्हणू शकत नाही.
मी असे ऐकले आहे की, 'आम्ही आयपीएल खेळतोय. त्यामुळे आमच्यावर खूप दडपण आहे. दडपण हा शब्द खूप सामान्य आहे, बरोबर? ते ज्यांना जाणवणार त्यांना मी 'खेळू नका' असे म्हणेन. तुम्हाला कोण विचारतं? तुमची ओळख क्रिकेटमुळे आहे. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही. दबाव आणि स्पर्धा असणारच, त्या पातळीवर जर तुम्ही खेळत असाल तर तुमची प्रशंसा होईल आणि टीकेलाही सामोरे जावे लागेल. तुम्हाला भीती वाटत असेल, टीका सहन करता येत नसेल, मग खेळू नका.'
१३० कोटींच्या देशात तुमच्यापैकी २० खेळाडू खेळत आहेत आणि तरीही तुम्ही म्हणता की तुमच्यावर दबाव आहे? त्याऐवजी, तुम्ही असा विचार करायला हवा की टीम इंडियासाठी मला खेळण्याची संधी मिळाली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, प्रत्येकाच्या नशिबात हे सुख येत नाही.कपिल देव