- अयाझ मेमन, थेट इंग्लंडहून
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना जबरदस्त रंगला. कोणीही विचार केला नव्हता की हा अंतिम सामना टाय होईल आणि सुपर ओव्हरमध्ये जाईल; आणि त्यानंतर सुपर ओव्हरही टाय होईल. अखेरीस ज्या संघाने सर्वाधिक चौकार मारले आहेत, तो संघ विजयी ठरेल याचाही कोणी विचार केला नसेल. नियमानुसार हा निर्णय योग्य असेलही; पण तरीही प्रत्येक क्रिकेटचाहत्यामध्ये या निर्णयावरून कुठेतरी नाराजी आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मोठी खिलाडूवृत्ती दाखवली. त्यांनी या नियमाविरुद्ध कोणताही आवाज उठवला नाही किंवा कोणतीही तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. पण माझ्या मते हा योग्य नियम नव्हता. अंतिम निकाल बरोबरीत होता व त्यामुळे चौकारांवर निर्णय घेणे माझ्या मते अयोग्य होते. निर्णय सर्वाधिक निर्धाव चेंडू, षटक यांवरही घेतला गेला असता. आयसीसीने गांभीर्याने विचार करावा.
इंग्लंडचा संघ सुरुवातीपासूनच संभाव्य विजेता होता. स्पर्धेत एकवेळ अशीही आलेली की त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येणार होते. पण ती अडचण दूर केल्यानंतर त्यांनी दमदार खेळ करीत चषक उंचावला. न्यूझीलंडनेही ज्या झुंजारपणे अखेरपर्यंत लढा दिला ते कौतुकास्पद होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळ केला. त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला होता व हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्यामुळे या स्पर्धेला वेगळीच चमक आली.
त्यांच्याकडून खिलाडूवृत्तीचेही दर्शन झाले. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात अत्यंत दडपणाच्या स्थितीत किवी संघाने दाखवलेली खिलाडूवृत्ती कौतुकास्पद आहे. कर्णधार केन विलियम्सननेही अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये कोणतीही टीका केली नाही. नशिबाने साथ दिली नाही, असे सांगतानाच त्याने आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला. इतकेच नाही, तर पत्रकार परिषदेच्या अखेरीस सर्व उपस्थित पत्रकारांनी विलियम्सनला उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व कळून येते. विलियम्सन केवळ महान खेळाडू नसून तो क्रिकेटचा एक चेहरा आहे.
भारताविषयी म्हणायचे झाल्यास उपांत्य सामन्यापर्यंत आपल्या संघाने केवळ एक सामना गमावला होता. उपांत्य सामन्यात भारताला नशिबाची साथ मिळाली नाही; पण एक मान्य करावे लागेल की न्यूझीलंडने त्या दिवशी शानदार खेळ केला. या पराभवानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, जे अपेक्षित होते. आता भारतीय संघाला आपल्या कामगिरीचे विश्लेषण करून पुढची तयारी करावी लागेल. भारताची आघाडीची फळी मजबूत असून आता मधली फळी मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
(कन्सल्टिंग एडिटर, लोकमत)
Web Title: Ken Williamson is the face of cricket!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.