विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत संजू सॅमनने ( Sanju Samson) आज दमदार शतकाची नोंद केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वन डे संघात निवड झालेल्या संजूने आज केरळ संघाचे नेतृत्व सांभाळताना रेल्वेविरुद्ध शतक झळकावले. पण, केरळला १८ धावांनी हार मानावी लागली. प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने ५ बाद २५५ धावा चोपल्या, परंतु केरळला ८ बाद २३७ धावाच करता आल्या.
रेल्वेची सुरुवात काही खास झाली नाही, परंतु प्रथम सिंग व साहब युवराज सिंग यांनी रेल्वेचा डाव सावरला. प्रताप सिंगने ७७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. साहब सिंग १३६ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारांच्या मदतीने १२१ धावांवर नाबाद राहिला. कर्णदार उपेंद्र यादवने ३१ धावांची खेळी करून संगाला २५५ धावांपर्यंत पोहोचवले. केरळच्या वैशाक चंद्रनने दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, केरळचे आघाडीचे ४ फलंदाज ५९ धावांत तंबूत परतले होते. सलामीवीर कृष्णा प्रसादने २९ धावा केल्या होत्या. संजू सॅमसन व श्रेयस गोपाळ यांनी केरळचा डाव सावरला होता. संजूने १३८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह १२८ धावांची खेळी केली. गोपाळ ५३ धावांवर बाद झाला. संजू ४९.५ व्या षटकात बाद झाला आणि केरळचा पराभव निश्चित झाला. रेल्वेच्या आर शर्माने ४ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वन डे संघ - लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.