हाँगकाँगविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात आयर्लंड संघाने 66 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडच्या 208 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघाला 9 बाद 142 धावा करता आल्या. या सामन्यात केव्हिन ओ'ब्रायनने 62 चेंडूंत 12 चौकार व 7 षटाकर खेचून 124 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याला सलामीवीर पॉल स्टीर्लींगने 36 धावांची खेळी करून उत्तम साथ दिली. केव्हिनने या खेळीसह आयर्लंड क्रिकेट इतिहासात एका वेगळ्या पराक्रमाची नोंद केली.
केव्हिन आणि स्टीर्लींगने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केव्हिनने तुफान फटकेबाजी केली. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळालेली नाही. आयर्लंडच्या 208 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला अपयश आले. हरुन हर्षद ( 45) आणि इहसान खान ( 28*) हे फलंदाज वगळता हाँगकाँगच्या अन्य खेळाडूंनी नांग्या टाकल्या. गॅरेथ डेनली, स्टुअर्ट थॉम्पसन आणि बॉय रँकीन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आयर्लंड संघाने 66 धावांनी हा सामना जिंकला.
या सामन्यात शतकी खेळी करून केव्हिनने विक्रमाला गवसणी घातली. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो आयर्लंडचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं 3 कसोटीत 258 धावा केल्या आहेत आणि 118 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 142 वन डे सामन्यांत त्यानं 2 शतकं व 18 अर्धशतकांसह 3490 धावा केल्या आहेत.