लंडन - इंग्लिश क्रिकेटमध्ये सतत विवादात अडकलेला फलंदाज केव्हीन पीटरसन अजूनही इंग्लंड चाहत्यांचा पसंतीतील खेळाडू आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंडचा सर्वोत्तम कसोटी संघासाठी केलेल्या आवाहानात चाहत्यांनी पीटरसनला स्थान दिले आहे. बोर्डाने 100 खेळाडूंची निवड केली होती आणि त्यापैकी सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडण्यासाठी त्यांनी चाहत्यांना आवाहन केले होते. 6000 मतांवरून अंतिम संघ निवडण्यात आला आहे.
इंग्लंडचा संघ बुधवारी 1000 वा कसोटी सामना खेळणार आहे आणि या ऐतिहासिक कसोटीचे औचित्य साधून बोर्डाने हे आवाहन केले होते. माजी कर्णधार आणि इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणा-या अॅलेस्टर कुकने या संघात स्थान पटकावले आहे. त्याच्याशिवाय सध्याच्या संघातील जेम्स अँडरसन आणि जो रूट यांनीही चाहत्यांची पसंती मिळवली आहे. कुकसह सलामीसाठी लेन हट्टन यांची निवड केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वोत्तम 364 धावांचा विक्रम हट्टन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1938च्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीत ही खेळी साकारली होती. सर्वाधिक धावा करणा-या इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले डेव्हीड गोवर ( 8231) यांची निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये चाहत्यांनी अँड्य्रू फ्लिंटॉफ आणि इयान बॉथम यांच्यापैकी बॉथम यांची निवड केली आहे. बॉथम यांच्या नावावर 5200 धावा आणि 383 विकेट आहेत.
इंग्लंडचा सर्वोत्तम संघ - अॅलेस्टर कुक, सर लिओनार्ड हट्टन, डेव्हीड गोवर, केव्हीन पीटरसन, जो रूट, सर इयान बॉथम, अॅलन नॉट (यष्टीरक्षक), ग्रॅमी स्वान, फ्रेड ट्रुएमन, जेम्स अँडरसन, बॉव विलिस.