Virat Kohli Kevin Pietersen Gossip, IND vs ENG 2nd ODI : भारतीय संघाने इंग्लंड विरूद्ध कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे होते. त्यापैकी कर्णधार रोहितला सूर गवसला. त्याने दमदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट कोहलीला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. पण तो सध्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली आणि इंग्लंडचा माजी महान फलंदाज केविन पीटरसन यांच्या काहीतरी संवाद रंगला. याच मुद्द्यावरून समालोचक आकाश चोप्राने चाहत्यांच्या वतीने केविन पीटरसनला एक मजेशीर सवाल केला. पीटरसनने देखील त्यावर धमाल उत्तर दिले.
विराट पीटरसन चर्चा काय?
केविन पीटरसन इंग्लंड-भारत मालिकेसाठी समालोचक म्हणून काम पाहत आहे. दुसऱ्या वनडेसाठी तो स्टेडियममध्ये आवारात फिल्ड रिपोर्टिंग करत होता. दुखापतीमुळे विराट पहिल्या सामन्याला मुकला. पण दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालच्या जागी त्याला संधी मिळाली. यावेळी फिल्डिंग करताना विराट सीमारेषेवर गप्पा मारताना दिसला. चाहत्यांनी याबद्दल अनेक अंदाज लावले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने चाहत्यांच्या वतीने प्रश्न विचारला की, 'विराट तुला लंडनमधील रिअल इस्टेट आणि चांगल्या घरांबद्दल किंवा ठिकाणांबद्दल विचारत होता का?'
केविन पीटरसननेही दिलं धमाल उत्तर
आकाश चोप्राच्या प्रश्नावर आधी पीटरसन खूप हसला. सुरेश रैना, आकाश चोप्रा आणि दीप दासगुप्ता हे तिघेही त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. त्यांना उद्देशून केविन पीटरसन म्हणाला की, 'अशा गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. आमच्यात झालेल्या चर्चा फार वेगळ्या आहेत. पण आम्ही नेमकं काय बोलत होतो ते मी इथे बोलणार नाही. पुढे पीटरसनला असेही विचारण्यात आले की, तू त्याच्याशी गोल्फ खेळण्याबाबत गप्पा मारत होतास का? तर पीटरसन म्हणाला, अशाच काहीशा गप्पा सुरु होत्या. मी त्याला गोल्फ खेळायचे फायदे सांगत होतो.
दरम्यान, विराट कोहली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर लंडनमध्येच स्थायिक होणार आहे अशा आशयाचा चर्चा काही महिने आधी रंगल्या होत्या. फेब्रुवारी २०२४ मध्ये विराटचा मुलगा अकाय याचा जन्मही लंडनमध्येच झाला. विराट त्याच्या कुटुंबासह लंडनला शिफ्ट होऊ शकतो या चर्चांनी त्यानंतर जोर धरला होता. पण विराट किंवा अनुष्का यांनी याबाबत कुठलेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
Web Title: kevin pietersen reveals conversation with virat kohli while fielding Ind vs Eng 2nd ODI London real estate rates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.