पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यात अपयश आले. मागील १६ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ यंदा संपेल असे आरसीबीच्या चाहत्यांना अपेक्षित असताना राजस्थानने मात्र त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला. बुधवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलच्या दिशेने कूच केली. आरसीबीला पुन्हा एकदा ट्रॉफीपासून वंचित राहावे लागले. मात्र, संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने यंदाचा हंगाम गाजवून ऑरेंज कॅप पटकावली.
सततच्या पराभवानंतर देखील विराट कोहलीने निष्ठा दाखवत आरसीबीच्या फ्रँचायझीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आली नसली तरी त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. विराटने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ७४१ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. पण, इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने विराटला आरसीबीतून बाहेर पडून इतर संघात खेळण्याचा सल्ला दिला. विराट आयपीएल ट्रॉफीसाठी पात्र असल्याने त्याने इतर संघात खेळून ट्रॉफी जिंकावी असेही पीटरसन म्हणाला.
Virat Kohli ला सल्ला!स्टार स्पोर्ट्सवर बोलताना पीटरसनने सांगितले की, मी या आधी देखील सांगितले आहे आणि आताही सांगतो की, विराटने आरसीबीतून बाहेर पडायला हवे. इतर खेळातील दिग्गजांनी देखील हा मार्ग अवलंबला आहे. विराटने यावेळीही चांगली कामगिरी केली, ऑरेंज कॅप जिंकली, सर्वकाही केले तरी फ्रँचायझी ट्रॉफी जिंकू शकत नाही. विराट संघाचा ब्रँड आहे हे मी समजू शकतो. पण तो ट्रॉफीसाठी पात्र आहे. तो अशा संघात खेळण्यास पात्र आहे जो ट्रॉफी जिंकेल.
तसेच विराटने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळल्यास त्याला अधिक यश मिळेल. असेही दिल्लीच्या संघाला अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. विराट दिल्लीचा लोकल बॉय आहे तिथे चाहत्यांचाही अधिक प्रतिसाद मिळेल, असेही केविन पीटरसनने म्हटले.