रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) काल गुजरात टायटन्सने पराभूत केल्यामुळे विराट कोहलीचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्रवास संपुष्टात आला... विराटने शतकी खेळी करूनही गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवले. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराटसह शुबमन गिलचंही शतक पाहायला मिळलां. १९८ धावांचे लक्ष्य गुजरातने १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा करून पार केले. शुबमन गिलनंही आयपीएलमध्ये सलग दुसरं शतक झळकावून RCBचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न संपुष्टात आणले. १६ हंगामात RCBला एकही आयपीएल जेतेपद पटकावता आलेले नाही.
विराटनेही सलग दुसरं शतक झळकावताना RCBला ५ बाद १९७ धावांपर्यंत मजल मारून दिली., त्याने ६१ चेंडूंत नाबाद १०१ धावांची खेळी केली. पण, हे शतक व्यर्थ गेलं. त्यामुळेच आता विराटला इंग्लंडचा माजी कर्णधार आणि RCBचा माजी खेळाडू केव्हीन पीटरसन याने मजेशीर सल्ला दिला आहे. त्याने विराटला RCBची साथ सोडून दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल होण्यास सांगितले आहे. त्याने ट्विट केले की, विराटने राजधानी शहराकडून खेळण्याची वेळ आलीय.
विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये २३७ सामन्यांत सर्वाधिक ७२६३ धावा आहेत आणि त्यात ७ शतकं व ५० अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या पर्वात विराटने १४ सामन्यांत दोन शतकं व सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या आहेत. विराटने ६० चेंडूंत आयपीएल २०२३ मधील दुसरे शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे ८वे शतक ठरले अन् त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम करताना ख्रिस गेलचा ( ६) विक्रम मोडला. विराट आणि फॅफ यांनी यंदाच्या पर्वात ९३९ धावांची भागीदारी केली आहे आणि २०१६ मध्ये विराट व एबी डिव्हिलियर्स यांच्या सर्वाधिक ९३९ धावांच्या विक्रमाशी आज बरोबरी झाली