चिंतामणी चषक पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व कुमार-मुली (जूनियर) मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पो. क्लबने तब्बल सोळा वर्षांनी पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा पराभव केला. महिलांमध्ये गतउपविजेते शिवनेरी सेवा मंडळ तीन वर्षांनंतर अमरहिंदला पराभूत करून अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी ठरले. निमंत्रित कुमारांचे विजेतेपद विद्यार्थी क्रीडा केंद्राने तर मुलींचे विजेतेपद शिवनेरी सेवा मंडळाने पटकावले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात माहीमच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबने दादरच्या गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा १४-१३ ( १०-०५ व ०४-०८) असा एक मिनिट राखून एक गुणाने पराभव केला. सरस्वतीतर्फे खेळताना श्रेयस राऊळने १:४०, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. निखिल कांबळेने १:००, मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. रोहन टेमकरने नाबाद १:४०, २:२० संरक्षण केले, चैतन्य धुळपने आक्रमणात ३ गडी बाद केले व अंतिम विजेतेपदावर सरस्वती स्पोर्ट्स क्लबने आपले नाव कोरले. तर ओम समर्थ तर्फे खेळताना प्रयाग कनगुटकरने २:२०, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बादकरून आपल्या खेळाची चमक दाखवली. शुभम शिगवणने २:२० मिनिटे संरक्षण करूनआक्रमणात २ गडी बाद केले व आशुतोष शिंदेने १:४०, १:२० मिनिटे संरक्षण करत ४ गडी बाद केला व जोरदार लढत दिली मात्र ती तोकडी पडली.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळने दादरच्याच अमर हिंद मंडळाचा १०-०६ (१०-०२,०४) असा एक डाव चार गुणांनी धुव्वा उडवला. शिवनेरीकडून खेळताना अक्षया गावडेने ३:३०, नाबाद १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळ केला. वैभवी अवघडेने ३:५०, १:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात एक खेळाडू बाद केले. शिवानी गुप्ताने २:४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात एक खेळाडू बाद केला. मयुरी लोटणकरने २:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन खेळाडू बाद करताना अजिंक्यपद काबिज केले. तर पराभूत अमर हिंदकडून खेळताना संजना कुडवने ५:४० मिनिटे संरक्षण केले. काव्याक्षी सोनारने १:२० मिनिटे संरक्षण केले व रुद्रा नाटेकरने आक्रमणात दोन खेळाडू बाद करून चांगला खेळ केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळने लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा ११-०४ (०५-०२ व ०६-०२) असा सात गुणांनी पराभव केला. शिवनेरीकडून खेळताना वैभवी अवघडेने ५:४०, १:२० मिनिटेसंरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद करत लोकांची वाहवा मिळवली. सायली म्हैसधुणेने ६:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात एक खेळाडू बाद केला, समीक्षा चव्हाणने २:३०, १:४० मिनिटे संरक्षण केले व काजल पासीने आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. तर पराभूत ओम साईश्वरकडून खेळताना अथश्री तेरवणकरने ४:२०, २:४० मिनिटे संरक्षण केले. ईशाली आंब्रेने ३:१०, १:३० संरक्षण करत आक्रमणात दोन खेळाडू बाद करून चांगला खेळ केला.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराचा १५-१३ (०७-०८-०८-०५) असा ३ मिनिटे राखून २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात विद्यार्थीच्या जितेश नेवाळकरने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ७ गडी बाद करून बहारदार खेळ केला. शुभम शिंदेने १:५०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. तर सम्यक जाधव व प्रतीक घाणेकर यांनी प्रत्येकी १:४०, २:०० मिनिटे संरक्षण केले. पराभूत श्री समर्थतर्फे जतिन गावकरने १:४०, १:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ गडी बाद करून आपल्या खेळाची चमक दाखली, तर जयेश नेवरेकरने १:०० मिनिट संरक्षण करत आक्रमणात ३ गडी बाद केले.
पुरस्कार पुरुष महिला
सर्वोत्कृष्ट संरक्षक - रोहण टेमकर (सरस्वती) संजना कुडव (अमरहिंद)
सर्वोत्कृष्ट आक्रमक - प्रयाग कानगुटकर (ओम समर्थ) शिवानी गुप्ता (शिवनेरी)
अष्टपैलू खेळाडू - श्रेयस राऊळ (सरस्वती) अक्षया गावडे (शिवनेरी)
Web Title: Kho Kho: After sixteen years Saraswati sports club won chintamani title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.