कराची : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड याने शनिवारी एका विक्रमाला गवसणी घातली. पीएसएल लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करताना 21 चेंडूंत 37 धावा चोपल्या. या खेळीत त्याने चार षटकार व एक चौकार खेचला आणि संघाला 20 षटकांत 214 धावांचा पल्ला गाठून दिला. या कामगिरीसह त्याने ट्वेंटी-20 क्रिकेमध्ये 9000 धावांचा पल्ला पार केला आणि ब्रेंडन मॅकलम व ख्रिस गेल यांच्या पंक्तीत स्थान पटकावले.
ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये पोलार्डने 458 सामन्यांत 9030 धावा केल्या आहेत. त्याने 150.47 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत आणि त्यात प्रत्येकी 585 षटकार व चौकारांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 प्रकारातील सर्वात स्फोटक खेळाडू म्हणून ओळख असलेल्या पोलार्डने 2006 मध्ये या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स, अॅडलेड स्ट्रायकर्स, बार्बाडोस ट्रायडेंट्स, केप कोब्रास, कराची किंग्स, ढाका ग्लॅडिएटर, मेलबर्न रेनेगेड्स, मुलतान सुलतान, पेशावर झालमी, दक्षिण ऑस्ट्रेलिया, एसटी लुसिया स्टार, त्रिनिदाद अॅण्ड तोबॅगो आणि सोमरसेट या ट्वेंटी-20 क्लब्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार मॅकलमने 370 ट्वेंटी-20 सामन्यांत 7 शतकं व 55 अर्धशतकांसहह 9922 धावा केल्या आहेत. गेलच्या नावावर 12318 धावा आहेत. त्यानं 21 शतकं आणि 76 अर्धशतकं चोपली आहेत. पोलार्डच्या नावावर एक शतक आणि 45 अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत पोलार्डने 59 सामन्यांत 788 धावा केल्या आहे.