इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर सर्व परदेशी खेळाडू मायदेशात परतले. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हाही माघारी परतला आहे आणि त्याला एक आनंदाची बातमीही मिळाली आहे. आगामी कॅरेबियन प्रीमिअर लीगसाठी ( Caribbean Premier League) फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर केली. CPLच्या २०२१ पर्वात पोलार्ड पुन्हा एकदा त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders ) संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. २०१९च्या पर्वात ड्वेन ब्रोव्होनं दुखापतीमुळे CPLमधून माघार घेतली होती आणि तेव्हा पोलार्डनं नाईट रायडर्सचे नेतृत्व सांभाळले होते.
२०१९च्या पर्वात क्वालिफायर २ मध्ये नाईट रायडर्सना बार्बाडोस ट्रायडंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, २०२०मध्ये नाईट रायडर्सनं सर्व १० साखळी सामने जिंकले होते आणि त्यानंतर जेतेपदही पटकावले. अंतिम सामन्यात पोलार्डच्या संघानं सेंट ल्युसिया झौक्सचा पराभव केला. २०२०च्या CPL मध्ये पोलार्डनं ११ सामन्यांत २०७ धावा केल्या होत्या. त्यात एका अर्धशतकासह ७२ धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा समावेश होता. पोलार्डनं एकूण ५२१ ट्वेंटी-२० सामन्यांत १०७९७ धावा केल्या आहेत. त्यात ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. २८ ऑगस्टपासून CPLच्या यंदाच्या पर्वाची सुरुवात होणार आहे.