IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील El Calssico लढत म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आज रंगणार आहे. हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, कृणाल पांड्या, राहुल चहर, क्विंटन डी कॉक यांना सक्षम पर्याय शोधण्यात मुंबईचा संघ सपशेल अपयशी ठरलाय. इशान किशनसाठी बक्कळ रक्कम मोजली खरी, परंतु त्याचे दडपण सलामीवीरावर जाणवत आहे. इशानला अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माही झगडतोय. ज्याच्याकडून सर्वाधिक भरवसा आहे, तो किरॉन पोलार्डही ( Kieron Pollard) अपयशी ठरलाय. त्यात त्याने कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
इंडियन प्रीमिअर लीगच्या आजच्या लढतीपूर्वी पोलार्डच्या MIच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर माजी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या सहा पराभवांना पोलार्डच कारणीभूत असल्याचा दावाही मांजरेकर यांनी केला. पोलार्डने आयपीएल २०२२मध्ये १६.४०च्या सरासरीने केवळ ८२ धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही त्याने फार कमाल केलेली नाही. त्याने १०च्या सरासरीने धावा देताना आतापर्यंत केवळ १ विकेट घेतली आहे.
''पोलार्डच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवायला हवे, असे मुंबई इंडियन्सला कधी वाटेल याची कल्पना नाही. पण, पोलार्डने किमान तीन षटकं तरी गोलंदाजी करायला हवी, मुंबई इंडियन्सला सध्या गोलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. चुरशीच्या क्षणी तो चांगली गोलंदाजी करू शकतो. पण, जर तो गोलंदाजी करत नसेल आणि अखेरच्या षटकांत फलंदाजीला येत असेल, तर त्याचा काय उपयोग. मुंबई इंडियन्सला पोलार्डकडून धावांची अपेक्षा आहे,''असे मांजरेकर म्हणाले.
पोलार्डने चौथ्या व सहाव्या सामन्यात गोलंदाजी केली नाही. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात पोलार्डची आकडेवारी चांगली आहे. त्याने ३७.९३च्या सरासरीने ५६९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याच्याकडू भरपूर अपेक्षा आहे.