मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यात फलंदाजी करण्याची शैली खूपच बदलली आहे. अनेक फलंदाज असे आहेत जे क्रिकेटच्या डिक्शनरीत नसणारा फटका मारून लक्षवेधून घेतात. MS धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटपासून ते अगदी पंत आणि सूर्यकुमार यादवनं आपल्या भात्यातील हटके शॉटनं क्रिकेट चाहत्यांना थक्क करून सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. उत्तुंग फटका मारण्यासाठी क्रीज सोडून फटकेबाजी करणारे फलंदाज तुम्हाला प्रत्येक सामन्यात पाहायला मिळेल. पण कधी तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळणारा फलंदाज पाहिलाय का? उत्तर नाही असं असेल तर पोलार्डचा हा व्हायरल व्हिडिओ बघा.
पोलार्डचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
केरॉन पॉलार्ड झटपट क्रिकेटमध्ये अनोख्या अंदाजातील फटकेबाजीनं अनेकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आका टी १० लीगमध्ये त्याचा आतापर्यंत कधीही न पाहिलाला अंदाज चर्चेचा विषय ठरतोय. एका चेंडूवर तो स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळताना दिसले. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही तो भाग वेगळा. पण अजब अंदाजात त्याने शॉट खेळण्याचा केलेला फसवा प्रयत्न पाहिल्यावर स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! किंवा पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? असे ऐकायला मिळाले तर नवल वाटणार नाही. स्टंपच्या मागे जाऊन फटका मारण्याचा त्याने जो प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोयय
कॅप्टन्सी करताना बिग हिटर पोलार्डचा संघर्ष अन्...
केरॉन पोलार्ड हा अबुधाबी टी १० लीगमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसत आहे. यूपी नवाब विरुद्धच्या सामन्यात पोलार्डनं अतरंगी अंदाजात फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पोलार्ड हा बिग हिटरच्या रुपात ओळखला जातो. पण न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाचे नेतृत्व करताना टी-१० लीगमधील सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आले. डावाच्या अखेरच्या षटकात ओडियन स्मिथच्या चेंडूवर त्याने हा अजब गजब शॉट खेळला.
तो नाबाद राहिला, पण त्याच्या संघानं सामना नाही जिंकला
या सामन्यात पोलार्डनं २१ चेंडूचा सामना करून फक्त १२ धावा केल्या. तो नाबाद परतला पण त्याच्या भात्यातून एकही चौकार किंवा षटकार आला नाही. परिणामी त्याच्या संघाला निर्धारित १० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना यूपी नवाब संघानं हा ६.१ षटकात ९ विकेट्स राखून खिशात घातला.