कटक : विराट कोहली आणि किरॉन पोलार्ड हे दोघेही आपल्या देशाचे कर्णधार. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एक क्षण असा पाहायला मिळाला जेव्हा पोलार्डने कोहलीला 'आय लव्ह यू' म्हटल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात पोलार्डने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पोलार्डला यावेळी अर्धशतकवीर निकोलस पुरनची चांगली साथ मिळाली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला ३१५ धावा करता आल्या.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी पहिली सहा षटके टाकली. त्यानंतर सातव्या षटकात सैनीला पहिले षटक टाकण्याची संधी देण्यात आली. सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले.
या सामन्यात जेव्हा पोलार्ड लयीत आला होता, तेव्हा त्याला कोहलीने डिवचले होते. कोहलीने पोलार्डला, बचाव का करतोस, मोठे फटके मार, असे म्हटले. यानंतर पोलार्डने कोहलीला उत्तर देताना 'आय लव्ह यू' म्हटल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजकडून एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. वेस्ट इंडिजच्या पहिल्या चार फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण या चौघांना अर्धशतक मात्र झळकावता आले नाही.
ज्याने जीवदान दिलं, त्यानेच काढला काटा; तिसऱ्या वनडेमध्ये घडलं असं काही...भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात ज्याने जीवदान दिले त्यानेच काटा काढल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीला पहिल्याच लढतीत विकेट मिळवण्याची सुवर्णसंधी होती. पण भारताच्या खेळाडूमुळे सैनीला पहिला बळी मिळवता आला नाही.
नवव्या षटकातील अखेरच्या चेंडूचा सामना वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस करत होता. सैनीने यावेळी अचूक चेंडू टाकला. या चेंडूने लुईसच्या बॅटची कडा घेतली आणि तो हवेत उडाला. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने जात होता. तिथे जडेजा उभा होता. हा चेंडू आता जडेजाच्या हातमध्ये विसावेल, असे वाटले होते. पण जडेजाला हा चेंडू झेलता आला नाही आणि सैनीची विकेट मिळवण्याची संधी हुकली.
जडेजाने हा झेल सोडला असला तरी त्याने आपल्या मनात लुईसला बाद करण्याची खुणगाठ बांधून ठेवली होती. कारण आपल्या पहिल्याच षटकात जडेजाने लुईसला २१ धावांवर असताना बाद केले. यावेळी लुईसचा झेल पकडला तो सैनीनेच.