कॅरेबियन क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्समुळे सुपरस्टार झालेल्या किरॉन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो अजूनही प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. एवढेच नाही तर वयाच्या ३७ वर्षीही फलंदाजातील धमाका तो दाखवून देताना दिसते. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील सामन्यात त्याची खास झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
पोलार्डची लॉर्ड खेळी! धमाकेदार फिफ्टीसह संघाला मिळवून दिला विजय
काही दिवसांपूर्वी राशिद खानच्या गोलंदाजीवर पाच चेंडूवर सलग पाच षटकार मारणाऱ्या किरॉन पोलार्ड याने कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL 2024) स्पर्धेतील सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावत आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला.
किरॉन पोलार्ड याने कॅप्टन्सीला साजेसा खेळ करून दाखवताना १९ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले.
पोलार्डनं एका षटकात ४ षटकार मारत फिरवला सामना
ट्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार पोलार्ड याची सेंट लूसिया किंग्स विरुद्धच्या खेळीची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. एक वेळ अशी होती की, ट्रिनबागोसाठी हा सामना जिंकण मुश्किल वाटत होता. पण पोलार्डनं 'मै हूँ ना शो' दाखवून देत अशक्यप्राय वाटणारा सामना संघाला जिंकून दिला. त्याने १९ व्या षटकात ४ षटकार मारत सामन्याला कलाटणी दिली. अखेरच्या षटकात त्याच्या संघाला एका षटकात फक्त ३ धावांची गरज होती. अकील हुसैननं चौकार मारत मॅच फिनिश केली.
३ षटकांमध्ये हव्या होत्या ३२ धावा, अखेरच्या दोन ओव्हरमध्ये प्रेशर आणखी वाढलं
ट्रिनबागो संघाने १७ व्या षटकात १५६ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. पोलार्डच्या संघाला शेवटच्या ३ षटकात जिंकण्यासाठी ३२ धावांची गरज होती. १८ व्या षटकात अल्जारी जोसेफनं फक्त ५ धावा खर्च करून ट्रिनबागो नाइट रायडर्सवरील दबाव आणखी वाढवला. या दबावात कसं खेळायचं ते किरोन पोलार्डनं पुन्हा एकदा दाखवून दिले. १९ व्या षटकात त्याने मॅथ्यू फोर्डला टार्गेट केलं. या षटकातील ४ षटकारांसह त्याने मॅचला कलाटणी दिली.
पोलार्डनं फक्त सिक्सरसह केली डील
किरॉन पोलार्डनं आपल्या १९ चेंडूतील ५२ धावांच्या खेळीत एकही चौकार मारला नाही. पण त्याच्या भात्यातून ७ उत्तुंग षटकार आले. टी२० क्रिकेटमध्ये आजही आपला दबदबा असल्याचे या गड्याने दाखवून दिले आहे. त्याच्या खात्यात या प्रकारात १३२०९ धावा जमा आहेत. गोलंदाजीत त्याने ३२२ विकेट्सही घेतल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टैपलूपैकी एक आहे.
Web Title: Kieron Pollard Smashes 19 Ball Fifty To Lead Trinbago Knight Riders To Victory Over St Lucia Kings Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.