Suresh Raina News : सुरेश रैना क्रिकेटविश्वात घडणाऱ्या घडामोडींवर सातत्याने भाष्य करत असतो. आता तो क्रिकेट नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. २०२० मध्ये पंजाबमधील पठाणकोटमध्ये सुरेश रैनाच्या काकांसह दोघांची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सर्व १२ आरोपींना दोषी घोषित केले असून, या दुहेरी हत्याकांडात पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तींमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमधील एकूण १२ आरोपींचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये पठाणकोटच्या थियाल या गावात काही लोकांनी घरात घुसून दरोडा टाकला होता. दरोडा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरोपींनी घरात उपस्थित असलेल्या लोकांवरही हल्ला केला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचाही समावेश होता.
१२ आरोपींना जन्मठेपया हत्येप्रकरणी पठाणकोटच्या शाहपूरकंडी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना शापूरकंडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. पठाणकोट न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी वकील हरीश पठानिया यांनी सांगितले की, हे प्रकरण चार वर्षांपूर्वी दोन जणांच्या हत्या आणि दरोड्याशी संबंधित आहे. मृत दोघांपैकी एक क्रिकेटपटू सुरेश रैनाचा काका होता.