Pahalgam Terrorist Attack, India vs Pakistan Cricket: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चार दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यातील दोन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानला धडा शिकवा, असा सूर सर्व स्तरातून उमटताना दिसतोय. याचदरम्यान, भारतीय माजी क्रिकेटपटूचा राग अनावर झाला असून, भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्व प्रकारचे क्रिकेटचे सामने कायमचे बंद करून टाका, अशी तीव्र भावना त्याने व्यक्त केली.
हल्ल्यानंतर क्रिकेटपटूचा संताप
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश संतापला आहे. एकीकडे बीसीसीआयने आयपीएल सामन्यांमधील फटाक्यांची आतषबाजी आणि चीअरलीडर्सचे नृत्य रद्द केले आहे. तसेच, कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करायचा नाही असेही स्पष्ट केले आहे. याचसोबत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळणंही बंद करून टाका असे मत भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने म्हटले आहे. श्रीवत्स गोस्वामी हा २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या १९ वर्षांखालील वनडे विश्वविजेत्या संघाचा भाग होता. त्याने या हल्ल्यानंतर रोखठोक शब्दांत भूमिका मांडली आहे.
मी आधीपासूनच सांगत होतो...
४ संघांकडून IPL खेळलेला श्रीवत्स गोस्वामी म्हणाला की, सर्वप्रथम पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला नकार द्या. मी आधीपासूनच सांगतोय की भारताने कधीही पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये. आताही नाही, नंतरही नाही. जेव्हा BCCI ने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता, त्यावेळी काही लोकांनी बाता मारल्या होत्या की खेळ आणि राजकारणाची सळमिसळ करू नका.
निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ
खरंच, अजूनही तुम्हाला असं वाटतं का? कारण मला जे दिसतंय त्यावरून असंच कळतं की निष्पाप भारतीयांना ठार मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे. जर त्यांना हा खेळ खेळत राहायचा असेल तर आता ती वेळ आलीय की, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. केवळ क्रिकेटच्या माध्यमातून नाही तर कुठलीही दयामाया न दाखवता प्रत्युत्तर द्यावं लागेल.
मी खूप दु:खी आहे. काही महिन्यांपूर्वीच मी लिजंड्स लीग स्पर्धेसाठी काश्मीरमध्ये होतो. मी त्यावेळी पहलगामलाही गेलो होतो. तेथील स्थानिक लोकांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसत होती. त्यांना असं वाटत होतं की अखेर तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. पण पुन्हा रक्तपात झालाच. आणखी किती वेळा पाकिस्ताननी केलेले हल्ले आपण पचवत राहायचे. आता बस्स झालं. यावेळी गप्प बसून चालणार नाही, अशी संतप्त भावना श्रीवत्स गोस्वामीने व्यक्त केली.