Virat Kohli Equals Embarrassing Record With 9-Ball Duck Against New Zealand : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिल्या डावात खातेही उघडू शकला नाही. अवघ्या चार-पाच कसोटी सामन्याचा अनुभव असलेल्या विल्यम ओ'रुर्क (William ORourke) या नवख्या गोलंदाजानं त्याला शून्यावर बाद केले. कोहली मागील काही दिवसांपासून मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्धही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले.
साडे सहा फूट उंचीच्या नवख्या गोलंदाजानं दिला कोहलीला चकवा
न्यूझीलंडच्या ताफ्यातील जवळपास ६ फूट ४ इंच उंच असणाऱ्या गोलंदाजाने आपल्या उंचीचा पूरेपूर फायदा घेत अचूक टप्प्यावर आखूड टप्प्याचा चेंडू टाकून विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवले. यावेळी लेग गलीत (leg gully) ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) रुपात केलेली फिल्डप्लेसमेंटही लाजवाब होती. ज्यामुळे भारतीय संघाला विराट धक्का देण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी ठरला. ग्लेन फिलिप्सनं एक अप्रतिम झेल टिपत कोहलीला शून्यावर माघारी धाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
किंग कोहलीच्या नावे झाला लाजिरावणा विक्रम
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होताच किंग कोहलीच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो ३८ व्या वेळी शून्यावर बाद झाला आहे. सक्रीय खेळाडूंमध्ये कोहलीसोबत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या यादीत न्यूझीलंडच्या टिम साउदीचा नंबर लागतो. तो एक गोलंदाज आहे. तो देखील ३८ वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ३३ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
२०१६ नंतर पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसला कोहली, इथं पाहा कोणत्या क्रमांकावर कशी राहिलीये त्याची कामगिरी
विराट कोहली हा सातत्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण शुबमन गिलच्या अनुपस्थितीत २०१६ नंतर पहिल्यांदाच तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. कसोटीत या क्रमांकावर त्याचा रेकॉर्ड फारसा बरा नाही. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ६ डावात त्याने अवघ्या १९.४ च्या सरासरीनं ९७ धावा केल्या आहेत. त्यात आता सातव्या डावात त्याच्या पदरी भोपळा आला. चौथ्या क्रमांकावर खेळताना विराट कोहलीने १४८ डावात ५२.५ च्या सरासरीने ७३५५ धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर ३१ डावात ३८.६ च्या सरासरीने त्याच्या खात्यात १०८० धावा जमा आहेत. काही सामन्यात तो सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही फलंदाजी करताना दिसला आहे. यात सहाव्या क्रमांकावर ९ डावात ४४.९ च्या सरासरीनं त्याने ४०४ धावा केल्या असून सातव्या क्रमांकावर एकाद बॅटिंग करताना त्याने ११ धावा काढल्या आहेत.