दुबई : मैदानावर रोज नवे विक्रम नोंदवित असलेल्या ‘किंग कोहली’ची ‘विराट’ छाप आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारामध्ये अनुभवाला मिळाली. त्यात ‘क्लीन स्वीप’ करताना भारतीय कर्णधार कसोटी, वन-डे आणि वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने त्याची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेल्या कसोटी व वन-डे संघाचा कर्णधार म्हणून निवड जाहीर केली.
२०१८ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला दिल्या जाणाºया सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसह आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी व वन-डे खेळाडू म्हणून निवड झाली. प्रतिष्ठेच्या या तिन्ही पुरस्कारासाठी निवड झालेला कोहली क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. कोहली सलग दुसºया वर्षी गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरला. आयसीसीने स्पष्ट केले की, ‘कोहली आयसीसीचे हे तीन प्रमुख पुरस्कार पटकाविणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचसोबत त्याची आयसीसी कसोटी व वन-डे संघाच्या कर्णधारपदी निवड जाहीर झाली आहे.’
कोहलीने गेल्या कॅलेंडर वर्षात (२०१८) १३ कसोटी सामन्यात ५५.०८ च्या सरासरीने १३२२ धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच शतके ठोकली. त्याने १४ वन-डे सामन्यांत सहा शतकांसह १३३.५५ च्या शानदार सरासरीने १२०२ धावा केल्या. भारतीय कर्णधाराने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २११ धावा केल्या आहेत. ३० वर्षीय कोहली सर्वप्रथम २००८ मध्ये भारताला अंडर-१९ विश्वकप पटकावून दिल्यानंतर प्रकाशझोतात आला होता.
भारतीय कर्णधार म्हणाला, ‘हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे कामगिरीत सातत्य राखण्याची प्रेरणा मिळते.’ आयसीसीच्या सर्वोत्तम संघात भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी तीन खेळाडूंना स्थान मिळाले तर वन-डे संघात भारत व इंग्लंडच्या प्रत्येकी चार खेळाडूंची निवड झाली आहे. कसोटी संघात कोहली व्यतिरिक्त भारतीय खेळाडूंमध्ये यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. कोहली व्यतिरिक्त बुमराह कसोटी व वन-डे संघात स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या पुरस्कारांमध्ये पंत याला यंदाचा उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वन-डे संघात कोहलीसह सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, फिरकीपटू कुलदीप यादव व बुमराह भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत तर इंग्लंडतर्फे जो रुट, जॉनी बेयरस्टा, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांना स्थान मिळाले आहे. कोहली २०१८मध्ये दोन्ही प्रकारच्या (वन-डे व कसोटी) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू आहे. तो कसोटीमध्ये १००० पेक्षा अधिक धावा फटकावणाºया केवळ दोन फलंदाजांपैकी एक आहे आणि वन-डे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाºया तीन खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.
आयसीसीच्या वोटिंग अकादमीने सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी सर्वसंमतीने कोहलीची निवड केली. येथे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा दुसºया स्थानी राहिला. रबाडा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराच्या शर्यतीत कोहलीच्या तुलनेत पिछाडीवर दुसºया स्थानी राहिला. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आयसीसी वर्षातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत कोहलीच्या तुलनेत दुसºया स्थानी राहिला.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सहा कसोटी सामने जिंकले व सात सामने गमावले. वन-डेमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ९ सामने जिंकले, तर चार सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला. एक सामना टाय झाला.
कोहलीने २०१७ मध्ये सर गारफिल्ड ट्रॉफी व आयसीसी सर्वोत्तम वन-डे खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. तो २०१२ मध्ये आयसीसी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
अन्य पुरस्कारांमध्ये न्यूझीलंडमध्ये विश्वकप जिंकणाºया भारतीय अंडर-१९ संघाची ‘फॅन्स मोमेंट आॅफ द ईयर’ पुरस्कारासाठी निवड झाली. भारतीय संघाला सर्वाधिक ४८ टक्के मते मिळाली. श्रीलंकेच्या कुमार धर्मसेना याची आंतरराष्ट्रीय कर्णधार व मॅच रेफ्री यांची वर्षातील सर्वोत्तम अंपायर म्हणून निवड केली. धर्मसेनाची दुसºयांदा सर्वोत्तम अंपायर पुरस्कारासाठी देण्यात येणाºया डेव्हिड शेफर्ड ट्रॉफीसाठी निवड झाली. ‘आयसीसी स्प्रीट आॅफ क्रिकेट’ पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनची निवड
झाली. (वृत्तसंस्था)
>आयसीसीचे पुरस्कार
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू : विराट कोहली.
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू : विराट कोहली.
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू : विराट कोहली. आयसीसी वर्षातील उदयोन्मुख खेळाडू : रिषभ पंत.
>आयसीसी २०१८ कसोटी संघ : टॉम लाथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विलियम्सन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), रिषभ पंत (भारत, यष्टिरक्षक), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नाथन लियोन (आॅस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान).
>आयसीसी २०१८ वन-डे संघ : रोहित शर्मा (भारत), जॉनी बेयरस्टा (इंग्लंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रुट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (इंग्लंड, यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्ताफिजुर रहमान (बांगलादेश), राशिद खान (अफगाणिस्तान), कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमराह (भारत).
Web Title: 'King Kohli' impression on ICC, best player award
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.