मेलबोर्न : फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीद्वारा ही दु:खद बातमी मिळाली. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना एका पत्रकाद्वारे माहिती देताना, वॉर्नचे थायलंडमधील समुई येथे निधन झाल्याचे सांगितले.
व्यवस्थापन कंपनीने आपल्या माहितीपत्रकामध्ये म्हटले की, 'शेन आपल्या व्हिलामध्ये बेशुद्ध आढळून आले. वैद्यकीय टीमच्या पूर्ण प्रयत्नानंतरही त्यांचा जीव वाचविण्यात यश आले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी या क्षणी शांत राहण्याचे आवाहन केले असून, योग्यवेळी पूर्ण माहिती देण्यात येईल. 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर केवळ वॉर्नने एक हजारहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
वॉर्नने भारताविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९९२ ते २००७ दरम्यान त्याने क्रिकेटविश्वावर आपला प्रभाव पाडला. या जोरावर विस्डेनने शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये वॉर्नचीही निवड केली होती. २०१३ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये वॉर्नचा समावेश झाला होता. १९९९ च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या यशात वॉर्नची कामगिरी निर्णायक ठरली होती.
आयपीएलचा पहिला 'राजा'
शेन वॉर्न पहिला आयपीएल विजेता कर्णधार आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघात फारसे स्टार खेळाडू नव्हते. वॉर्नच्या रूपाने त्यांच्याकडे जागतिक चेहरा होता. संघाची धुराही त्याच्याकडेच देण्यात आली होती. कर्णधार म्हणून वॉर्नने संघात स्टार खेळाडू नसल्याचे कोणतेही दडपण न घेता युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेतली. त्याने शेन वॉटसनच्या अष्टपैलू खेळाचा कल्पकतेने वापर केला. आपल्या कल्पक आणि आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर वॉर्नने पहिला आयपीएल विजेता कर्णधार होण्याचा मान मिळवला.
नियतीपुढे सारेच हतबल...
शेन वॉर्नने क्रिकेटपटू रॉडनी मार्शच्या निधनावर काही तासांआधीच शोक व्यक्त केला होता. ‘ते आमच्या महान खेळातील अर्ध्वयू होते शिवाय युवा खेळाडूंसाठी प्रेरणा होते,’ ट्विट वॉर्नने केले. पण या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते. पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा वेध घेणे फारच कठीण. म्हणूनच एक शायर म्हणतो,‘आगाह अपनी मौत से कोई यहां नही, सामां है सौ बरस का पल की खबर नही!
क्रिकेटविश्व स्तब्ध!
मी स्तब्ध झालोय. तुझी कमतरता नेहमी भासेल वॉर्न. मैदानात किंवा मैदानाबाहेर तुझ्यासोबतचा कोणताही क्षण कंटाळवाणा ठरत नव्हता. मैदानावरील आपली कट्टर प्रतिस्पर्धा आणि मैदानाबाहेरील आपली मजा-मस्ती कायम आठवणीत राहील. - सचिन तेंडुलकर
आयुष्य किती अस्थिर आहे. एक असे महान खेळाडू ज्यांना मी मैदानाबाहेरही चांगला ओळखत होतो. त्यांच्या जाण्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. क्रिकेटच्या चेंडूला फिरकी देणारा सर्वात महान खेळाडू. सर्वकालीन सर्वोत्तम. - विराट कोहली
जागतिक क्रिकेटसाठी दु:खद दिवस. पहिले रॉडनी मार्श आणि आता शेन वॉर्न. मन तुटलंय. वॉर्नसोबत खेळण्याच्या सुखद आठवणी आहेत. तो फिरकीचा जादूगार होता आणि महान होता. - युवराज सिंग
विश्वास बसत नाही. माझ्याकडे भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत. दिग्गज आणि महान खेळाडूंपैकी एक. खूप लवकर निघून गेला. वॉर्नच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे. - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
नैसर्गिक गुणवत्तेसह त्याच्यासारखा खेळ अत्यंत दुर्मीळ असतो. शेन वॉर्नने गोलंदाजीला जादुई स्वरूप दिले. - गौतम गंभीर
शेन वॉर्न आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. या बातमीवर विश्वास ठेवावंस वाटत नाही. पूर्णपणे कोलमडलोय. - हरभजन सिंग
फिरकीला ‘कूल’ बनविणाऱ्या जगातील महान फिरकीपटूंपैकी एक शेन वॉर्न आता आपल्यात नाहीत. आयुष्य अत्यंत नाजूक आहे; पण यावर भरवसा करणे कठीण आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहे. - वीरेंद्र सेहवाग
शेन वॉर्न क्रिकेटप्रेमींचे लाडके होते. फिरकीचे जादूगार. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दिग्गज. आयपीएल जिंकणारे पहिले कर्णधार. त्यांची कमतरता कायम भासेल. - इरफान पठाण
ही कमतरता भरून काढण्यास खूप वेळ लागेल. महान शेन वॉर्न आता आपल्यामध्ये नाही राहिले.- शोएब अख्तर (पाकिस्तान)
या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. क्रिकेटविश्वाला मोठा धक्का. आपल्या जादुई लेगस्पिनरने त्यांनी अनेक पिढी प्रेरित केल्या. तुमची कमतरता नेहमी भासेल, शेन वॉर्न. - बाबर आझम (पाकिस्तान)
क्रिकेटविश्वाने लेग स्पिनच्या विश्वविद्यालयाला गमावले. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्यांच्या गोलंदाजीचा चाहता होतो. त्यांच्याविरुद्ध खेळणे नेहमी विशेष ठरले. त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी. - शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)