- रोहित नाईक
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला अद्याप एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. २०१४ मध्ये मिळवलेले उपविजेतेपद वगळता या संघाकडून फारशी लक्षवेधी कामगिरी झालेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात पंजाब संघाने तिसरे स्थान मिळवले होते.
या संघाने नेहमीच आपल्या ताफ्यात अनेक बदल केले. पंजाबचे नेतृत्व आतापर्यंत १२ खेळाडूंनी केले आहे. भारताचा स्टार सलामीवीर लोकेश राहुलकडे सध्या पंजाबचे नेतृत्व असून त्याच्या जोडीला अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंची सेना आहे. विजेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पंजाबकडे आहेत. त्यांना आता केवळ विदेशी खेळाडूंचे गणित जुळवावे लागेल. पंजाबने आपल्या मधल्या फळीसह डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीला मजबुती देण्यासाठी अनेक खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले. ख्रिस गेल आणि राहुल अशी स्फोटक सलामीवीरांची जोडी पंजाबकडे आहे.
मधल्या फळीला मयांक अगरवाल, ग्लेन मॅक्सवेल यांच्यामुळे मजबुती मिळेल. मोहम्मद शमीच्या रूपाने पंजाबकडे भक्कम गोलंदाज आहे. मात्र त्याच्या एकट्यावर अवलंबून राहणे पंजाबला भारी पडेल. रविचंद्रन अश्विनची कमतरता पंजाबला नक्कीच भासेल. त्याची जागा १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत स्टार ठरलेला लेगस्पिनर रवी बिश्नोई घेऊ शकतो. त्याच्या गोलंदाजीतील वैविध्यता प्रतिस्पर्ध्यांना बुचकळ्यात पाडू शकते.
सर्वोत्तम कामगिरी :२०१४ साली उपविजेतेपद.
फलंदाजी : राहुल आणि धडाकेबाज ख्रिस गेल यांच्यावर मुख्य मदार असून, मधल्या फळीत मयांक अगरवाल, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, सरफराझ खान आणि संधी मिळाल्यास करुण नायर महत्त्वाचे ठरतील.
गोलंदाजी : मोहम्मद शमीवर पूर्ण मदार. युवा फिरकीपटू रवी बिश्नोई प्रतिस्पर्ध्यांना अडचणीचा ठरू शकेल. शेल्डॉन कॉटेÑल, ख्रिस जॉर्डन आणि ईशान पोरेल या वेगवान गोलंदाजांचाही पर्याय आहे. मुजीब-उर- रहमान या स्टार फिरकीपटूकडून संघाला मोठ्या अपेक्षा.
मुख्य ताकद :
राहुल-गेल यांची वेगवान सुरुवात. एकटा गेल जरी खेळपट्टीवर टिकला, तरी तो संघाला भलीमोठी मजल मारून देईल. तसेच मॅक्सवेल-पूरन यांची मधल्या षटकातील चौफेर फटकेबाजी ठरेल निर्णायक.
Web Title: Kings XI Punjab; IPL 02 days left
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.