भारतीय क्रिकेटपटू दिवाळी सण साजरा करण्यासाठी सध्या सुट्टीवर आहेत... दिवाळीनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, सणासुदीच्या या धामधुमीत इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबच्या एका 18 वर्षीय खेळाडूनं गुपचुप साखरपुडा आटपून घेतला. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. या खेळाडूनं 2018च्या आयपीएल स्पर्धेतून पदार्पण करत इतिहास रचला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात ( 17 वर्ष व 11 दिवस) युवा खेळाडू ठरला होता.. आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान असे या खेळाडूचे नाव आहे. आपल्या ऑफ स्पीन गोलंदाजीनं मुजीबनं भल्याभल्या खेळाडूंना अचंबित केले आहे. वयाच्या 18व्या वर्षीच त्यानं जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. युवा वन डे सामन्यात त्यानं अफगाणिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना बांगलादेशच्या 7 फलंदाजांना अवघ्या 19 धावांत माघारी पाठवले होते. युवा वन डे क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
या कामगिरीच्या जोरावीर त्यानं 16व्या वर्षी बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये कोमिल्ला व्हिक्टोरियन संघात स्थान पटकावले. त्यानंतर त्याच्या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्ताननं 19 वर्षांखालील आशिया चषक जिंकून इतिहास घडवला. मुजीबनं अंतिम सामन्याप पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. उपांत्य फेरीत त्यानं नेपाळविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतही अफगाणिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबनं 2018मध्ये त्याला 4 कोटी रुपये मोजून आपल्या चमूत दाखल करून घेतले होते.