नवी दिल्ली : भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर देव, अशी बऱ्याच जणांची भावना आहे. आपल्या या देवाबद्दल वाईट ऐकायला हे चाहते कधीच तयार नसतात. त्याच्याबरोबर जर कुणी वाईट वागले तर त्याच्यावर आगपाखड करतात. त्यांचे हे अतीव प्रेम नेहमीच पाहायला मिळाले आहे. पण जर सचिनला माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी मैदानातच लाथ मारली होती, असे तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट घडलेली आहे.
प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद केल्यावर खेळाडू आपला आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. काही जण मैदानात फेर धरतात, कधी कधी टी-शर्ट काढतात, पण आतापर्यंत खेळाडूला बाद केल्यावर खेळाडू एकमेकांना लाथ मारताना तुम्ही पाहिले नसेल. पण असे मात्र घडले आहे आणि तेही सचिन तेंडुलकरच्या बाबतीत.
ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा भारताचे कर्णधारपद मोहम्मद अझरुद्दिनकडे होतं. त्यावेळी एका सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद केल्यावर संघातील खेळाडू आनंद व्यक्त करत होते. त्यामध्ये सचिन आणि मोरे यांचाही समावेश होता. जेव्हा सचिन मोरे यांच्या जवळ गेला तेव्हा त्यांनी सचिनला लाथ मारली होती.
हे सारे ऐकल्यावर तुमच्या मनात आता बरेच प्रश्न आले असतील. सचिनकडून अशी काय चूक झाली होती? मोरे यांनी सचिनला लाथ का मारावी? सचिनने हे सर्व सहन कसे केले? वगैरे...वगैरे. पण सचिन आणि मोरे यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. दोघे चांगलेच मस्तीखोरही होते. त्यामुळे मोरे यांनी मस्करी करताना सचिनला लाथ मारली होती.