महेंद्र सिंह धोनी... बस नाम ही काफी है चा प्रत्यय कालच्या सामन्यात आला. सोलापूरची महिला क्रिकेटर किरण नवगिरेने तिला स्पॉन्सर मिळाला नाही म्हणून धोनीचे नाव तिच्या बॅटवर लिहिले आणइ खेळायला उतरली. एवढ्या धावा ठोकल्या की आता तिच्यासमोर स्पॉन्सर्सची रांग लागेल.
किरण नवगिरे ही उत्तर प्रदेश वॉरिअर्समधून खेळत आहे. लिलावामध्ये फ्रँचायझीने तिला ३० लाखांचे बेस प्राईज मोजून आपल्य़ा टीममध्ये घेतले आहे. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात २७ वर्षीय किरण नवगिरेने अर्धशतकी खेळी केली. जाहिरातदार कंपन्यांकडून ती दुर्लक्षितच राहिली होती. बॅटवर स्पॉन्सर कोणी नाही म्हणून तिने धोनीचे नाव लिहिले होते.
कोऱ्या बॅटवर तिने MSD 07 लिहिले आणि त्याच जोशाने ती खेळायला उतरली. जेव्हा कॅमेरांच्या नजरा तिच्या बॅटकडे वळल्या तेव्हा त्या कॅमेरामनलाही काही काळ धक्का बसला होता. बॅटच्या मागच्या भागावर तिने मार्करने एमएसडी ०७ असे लिहिले होते. किरण ही धोनीही फॅन आहे, तिनेही अनेकदा हे सांगितले आहे.
गुजरातविरुद्धच्या या सामन्यात किरण नवगिरेने अर्धशतक झळकावले. ग्रेस हॅरिसच्या झंझावाती खेळीपूर्वी तिने संघाची धुरा सांभाळली होती. युपीच्या तीन विकेट्स अवघ्या २० धावांवर पडल्या होत्या. तिने संघ सावरला. दीप्ती शर्मा (11) सोबत चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. अर्थात यात तिच्याच जास्त धावा होत्या. 43 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. किरण नवगिरेने भारतासाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.