Join us  

किशनने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’; इंग्लंडविरुद्ध सात गड्यांनी विजय; कोहलीने मिळविला फॉर्म

पहिला सामन्यात केलेल्या चुका टाळताना भारताने नियोजनबद्ध खेळ केला. शिखर धवन व अक्षर पटेल यांना विश्रांती देत कर्णधार कोहलीने युवा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 2:24 AM

Open in App

अहमदाबाद : आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा युवा इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावताना भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध सात गड्यांनी विजयी केले. या जबरदस्त पुनरागमनासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १६४ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.५ षटकांत ३ बाद १६६ धावा केल्या. (Kishan completes India's 'mission'; India defeated England by seven wickets)

पहिला सामन्यात केलेल्या चुका टाळताना भारताने नियोजनबद्ध खेळ केला. शिखर धवन व अक्षर पटेल यांना विश्रांती देत कर्णधार कोहलीने युवा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. आयपीएलमध्ये छाप पाडलेल्या ईशानने धावांचा पाठलाग करताना इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. लोकेश राहुल शून्यावर बाद झाल्यानंतर ईशानने ५ चौकार व ४ षटकारांचा पाऊस पाडत ३२ चेंडूंत ५६ धावा फटकावल्या. त्याने कोहलीसह ९४ धावांची भागीदारी केली. कोहलीनेही आपला फॉर्म मिळवताना ४९ चेंडूंत ५ चौकार ३ षटकारांसह नाबाद ७३ धावांचा तडाखा दिला. ॠषभ पंतने १३ चेंडूंत २६ धावा फटकावल्या. 

त्याआधी, इंग्लंडला मर्यादित धावसंख्येत रोखले असले, तरी तब्बल १६ अतिरिक्त धावांची खैरात करत भारतीयांनी इंग्लंडला दीडशेपलीकडे मजल मारण्यास मदतच केली. १० लेग बाय, ५ वाइड व एक बाय असे १६ अवांतर धावा देत भारताने पूर्ण वर्चस्वाची संधी गमावली. वॉशिंग्टर सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने धोकादायक सलामीवीर जोस बटलर (०) याला माघारी धाडले. जेसन रॉय व डेव्हिड मलान यांनी ६४ धावांची भागीदारी केली. दोघांनी जम बसवल्याचे दिसत असतानाच युझवेंद्र चहलने मलानला तंबूचा रस्ता दाखवला. मलानने २३ चेंडूंत २४ धावा केल्या. रॉयने ३५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावा केल्या. त्याच्यामुळे इंग्लंडच्या धावगतीवर फारसा परिणाम झाला नाही. इंग्लंडच्या मधल्या फळीला फारशा धावा करता आल्या नाही. मात्र त्यांनी कमी चेंडूंत उपयुक्त फटकेबाजी केल्याने इंग्लंडला दीडशेचा पल्ला पार करण्यात अडचण आली नाही.

धावफलकइंग्लंड : जेसन रॉय झे. भुवनेश्वर गो. सुंदर ४६, जोस बटलर पायचीत गो. भुवनेश्वर ०, डेव्हिड मलान पायचीत गो. चहल २४, जॉनी बेयरस्टॉ झे. यादव गो. सुंदर २०, इयॉन मॉर्गन झे. पंत गो. ठाकूर २८, बेन स्टोक्स झे. हार्दिक गो. ठाकूर २४, सॅम कुरेन नाबाद ६, ख्रिस जॉर्डन नाबाद ०. अवांतर - १६. एकूण : २० षटकांत ६ बाद १६४ धावा.

गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२८-१; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२९-२; शार्दुल ठाकूर ४-०-२९-२; हार्दिक पांड्या ४-०-३३-०; युझवेंद्र चहल ४-०-३४-१.

भारत : लोकेश राहुल झे. बटलर गो. कुरेन ०, इशान किशन पायचीत गो. राशिद ५६, विराट कोहली नाबाद ७३, ॠषभ पंत झे. बेयरस्टॉ गो. जॉर्डन २६, श्रेयस अय्यर नाबाद ८. अवांतर - ३ धावा. एकूण : १७.५ षटकांत ३ बाद १६६ धावा.

गोलंदाजी : सॅम कुरेन ४-१-२२-१; जोफ्रा आर्चर ४-०-२४-०; ख्रिस जॉर्डन २.५-०-३८-१ ; टॉम कुरेन २-०-२६-० ; बेन स्टोक्स १-०-१७-० ; आदिल राशिद ४-०-३८-१.

ईशान, सूर्याकुमार यांचे पदार्पणअनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांना दुसऱ्या टी-२०  सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्याचवेळी, सूर्यकुमार यादव आणि युवा ईशान किशन या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून छाप पाडलेल्या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले. 

किंग कोहलीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार  १२ हजार धावा पूर्ण करणारा कोहली तिसरा कर्णधार ठरला. याआधी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग व दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ यांनी केली आहे.  - कोहलीने २६वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतकही झळकावले. - आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३ हजार धावा पूर्ण करणारा कोहली पहिला भारतीय ठरला. 

ईशान तडाखाआंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पणात  अर्धशतक झळकावणारा ईशान किशन भारताचा चौथा फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी रॉबिन उथप्पा, रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पदार्पणातच चार षटकार ठोकणारा ईशान पहिलाच भारतीय ठरला.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!कोरोनाच्या प्रकोपामुळे क्रिकेटविश्वावर अनेक मर्यादा आल्या असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेवरही याचा परिणाम पाहण्यास मिळाला. याआधी झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रेक्षकांविना झाल्यानंतर इतर सामने ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाले. परंतु यावेळी, प्रेक्षकांनी सामाजिक सुरक्षित अंतर राखल्याचेही निदर्शनास आले होते. टी-२० क्रिकेट मालिकेला सुरुवात झाल्यानंतर मात्र सामाजिक सुरक्षित अंतर राखल्याचे दिसून आले नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा देण्यात आल्यानंतर काही स्टँड प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसत असताना काही स्टँड मात्र रिकामेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षक दाटीवाटीने बसल्याचे दिसून आले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेट सट्टेबाजी