मुंबई - यंदाच्या मोसमात एकतर्फी विजयांचा धडाका लावलेल्या भारतीय संघाचे पारडे रविवारपासून सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत नक्कीच वरचढ असेल. श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत क्लीनस्वीप दिल्यानंतर घरच्या मैदानावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियालाही भारताने सहज लोळवले. हाच फॉर्म भारतीय संघाने कायम राखल्यास किवी संघाला यजमानांना रोखणे अत्यंत कठीण जाईल.
भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघ समतोल असून त्यांच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी प्रत्येक विजयामध्ये मोलाचे योगदान दिले असून हीच बाब भारतीय संघासाठी मजबूत आहे. एक संघ म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरच भारताला दक्षिण आफ्रिकेविरुध्द दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी, आफ्रिकेने ४०० हून अधिक धावांचा तडाखा देत भारताला सहजपणे पराभूत करत मालिकाही जिंकली होती. मात्र या पराभवानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग तीन मालिका जिंकल्या असून न्यूझीलंडविरुध्दही भारताचा विजय मानला जात आहे.
दरम्यान, सध्या भारतीय संघाचा सुरु असलेल्या विजयी धडाका पाहता, न्यूझीलंडला टीम इंडियाचा अश्वमेध रोखणे कठिण असेल. तसेच, २००९-१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झालेल्या भारताने यानंतर १६ द्विपक्षीय मालिका खेळले असून त्यापैकी पाकिस्तान (२०१२) आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारताला पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय, नुकताच झालेल्या मालिकेत आॅस्ट्रेलियाला नमवून आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेने पिछाडीवर टाकले. हेच अव्वल स्थान पुन्हा मिळवण्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याने न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावाच लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत कर्णधार आणि हुकमी फलंदाज विराट कोहली आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. शिवाय शिखर धवनही संघाबाहेर होता. मात्र रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्या यांनी ही कसर भरुन काढली. अनुभवी महेंद्रसिंग धोनीनेही मोक्याच्यावेळी चमकदार कामगिरी केली. हीच कामगिरी भारताने कायम राखली, तर न्यूझीलंडला मुंबईत विजय मिळवणे खूप कठीण होईल. त्याचबरोबर मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सामन्यात बाजी मारताना न्यूझीलंडच्या उणीवाही समोर आणल्याने टीम इंडियासाठी विजय मिळवणे फार कठिण होणार नाही. परंतु, तरीही न्यूझीलंडला गृहीत धरण्याची चूक भारतीय संघ कदापि करणार नाही.गोलंदाजीमध्ये चायनामन कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांच्या नेतृत्त्वामध्ये फिरकीपटूंनी चांगला मारा केला. त्यांच्या जोडीला अक्षर पटेलही असेल. शिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांचा वेगवान मारा न्यूझीलंड फलंदाजांची परीक्षा पाहणारा ठरेल. दुसरीकडे, किवी संघाला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरकडून सर्वाधिक आशा असेल. दुसºया सराव सामन्यात आक्रमक शतक झळकावताना त्याने भारताला एकप्रकारे इशाराही दिला. तसेच, टॉम लॅथमनेही आक्रमक शतक ठोकत न्यूझीलंडम फलंदाजीची ताकद दाखवली आहे. त्याचप्रमाणे सलामीवीर मार्टिन गुप्टिल, कर्णधार केन विलियम्सन यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी हे भारतीय फलंदाजीला खिंडार पडण्याची क्षमता राखून आहेत. तसेच, मिशेल सँटनर आणि ईश सोढी या फिरकीपटूंवर मधल्या षटकांमध्ये भारताचा धडाका रोखण्याची जबाबदारी असेल.
यातून निवडणार संघ :भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर.न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डि ग्रँडेहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोढी, टिम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वॉर्कर आणि टॉड अॅस्टल.