मँचेस्टर : ‘रन मशीन’ रोहित शर्मासह चमकदार कामगिरी करीत असलेल्या भारताच्या आघाडीच्या फळीला उपांत्य फेरीत मंगळवारी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचे आव्हान राहील. या स्पर्धेत ‘प्लॅन बी’च्या अभावानंतरही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या नाही, पण अखेरचे दोन अडथळे पार करताना कुठलीही चूक महागडी ठरू शकते. उपांत्य फेरीत रोहित विरुद्ध लोकी फर्ग्युसन, लोकेश राहुल वि. ट्रेंट बोल्ट, कोहली वि. मॅट हेन्री अशा लढतींची उत्सुकता राहील.
दुसरीकडे ‘संकटमोचक’ केन विलियम्सनचे फिरकीपटूंविरुद्धचे तंत्र किंवा रॉस टेलरची जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळण्याची उत्सुकता राहील. महेंद्रसिंग धोनी मिशेल सँटनेरचा सामना कसा करतो याचीही उत्सुकता राहील. न्यूझीलंडने साखळी फेरीतील अखेरचे तीन सामने गमावले, पण सुरुवातीच्या सामन्यांतील चांगल्या कामगिरीच्या आधारावर त्यांनी अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले आहे.
भारतातर्फे रोहित (६४७), राहुल (३६०) व कोहली (४४२) यांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसन (१७ बळी), बोल्ट (१५ बळी) व मॅट हेन्री (१० बळी) यांनी एकूण ४२ फलंदाजांना माघारी परतवले आहे.
आघाडीची फळी कमालीची यशस्वी ठरल्यामुळे भारताच्या मधल्या फळीची चाचणी झालेली नाही. अशा स्थितीत ढगाळ वातावरण असलेल्या मँचेस्टरच्या मैदानावर बोल्टची गोलंदाजी भेदक ठरू शकते. या व्यतिरिक्त हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता मधल्या फळीतील अन्य फलंदाजांना विशेष छाप सोडता आलेली नाही. धोनी आपल्या नेहमीच्या शैलीत भासला नाही.
न्यूझीलंडची कमकुवत बाजू म्हणजे त्यांची आघाडीची फळी. विलियम्सनचा (४८१) अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. बुमराह किवीविरुद्धच्या गेल्या द्विपक्षीय मालिकेत खेळला नव्हता. त्यामुळे मार्टिन गुप्टील व कोलिन मुन्रो यांना त्याच्याविरुद्ध खेळणे सोपी बाब नाही.
नाणेफेक जिंका... सामना जिंका...
विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाºया संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, नुकताच भारताने श्रीलंकेचा ७ गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करून जिंकण्याच्या मोहिमेला हा अपवाद असला, तरी प्रथम फलंदाजी करणारे संघ अधिक जिंकले आहेत. गेल्या २० सामन्यांत १६ सामने हे प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले आहेत. आतापर्यंत ४२ सामने झाले आहेत. त्यात १४ सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर २७ सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. २००७ च्या विश्वचषकात मात्र गणित वेगळे होते. प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाºया संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे २५-२५ अशी होती. २०११ मध्ये ती २४-२३ अशी तर २०१५ ती २४-२४ अशी होती. २०१९ मध्ये मात्र ती २७-१४ अशी आहे. म्हणजे लक्ष्य गाठताना १४ संघांनाच यश आले आहे.
तिकीट मिळविण्यासाठी ओढाताण
ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील पहिल्या उपांत्य सामन्याची तिकिटे ‘सोल्ड आउट’ झाली असल्याने आॅनलाइन तिकिटे काढण्यासाठी प्रेक्षकांची ओढाताण झाली आहे. काही तासांतच सर्व तिकिटे संपली. या मैैदानाची प्रेक्षक क्षमता तशी १९ हजार आहे, मात्र, विशेष स्टॅँड उभारल्याने ती २६ हजारांवर पोहोचली. तिकिटाची किंमत १३ हजार रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत होती.
चौथ्या नंबरची परीक्षा
रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण धावगतीनुसार त्याला खेळावे लागेल. नाहीतर इग्लंडविरुद्ध जी स्थिती निर्माण झाली होती ती चिंतेची बाब ठरेल. विराट मोठी खेळी करू शकतो. परंतु, प्रश्न आहे तो चौथ्या क्रमांकाचा. रिषभ पंतला श्रीलंकेविरुद्ध अजमावण्यात आले, त्यावेळी सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता. केवळ औपचारिकता उरली होती. तेव्हा पंतने आपली विकेट गमावली.
बुमराह व शमीचा फॉर्म बघता भारत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू शकतो. न्यूझीलंडकडे उजव्या हाताने फलंदाजी करणाºया जास्त खेळाडूंचा समावेश असल्याने भारत मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया दोन फिरकीपटूंपैकी एकाची निवड करू शकतो. युझवेंद्र चहलच्या तंदुरुस्तीबाबत कल्पना नाही. रवींद्र जडेजाने आपल्या पहिल्याच लढतीत चांगली कामगिरी केली. भारताने तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतल्यास केदार जाधव पुन्हा दिनेश कार्तिकचे स्थान घेऊ शकतो.
Web Title: Kiwi paceman challenge to Indian batsmen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.