अयाज मेमन -
अबुधाबी : कोलकाता नाइट रायडर्सने तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सची दर्जेदार गोलंदाजी निष्प्रभ करत ७ गड्यांनी बाजी मारली. मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत केकेआरने १५.१ षटकांतच ३ बाद १५९ धावा केल्या. युवा व्यंकटेश अय्यर व राहुल त्रिपाठी यांची फटकेबाजी मुंबईला महागात पडली. केकेआरचे तिन्ही बळी जसप्रीत बुमराहने घेतल्या. मात्र, त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
शुभमन गिल व अय्यर यांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहने गिलला बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, अय्यरने राहुलसह ८८ धावांची भागीदारी करत मुंबईला बॅकफूटवर नेले. त्याच्या फटकेबाजीपुढे मुंबईची तगडी गोलंदाजी अगदीच कमकुवत भासू लागली. अय्यरला नेमका चेंडू कुठे व कसा टाकावा हेच मुंबईकरांना समजत नव्हते. त्याने ३० चेंडूंत ५३ धावांचा तडाखा दिला. त्यात दुसऱ्या टोकावरून राहुलने आपला दांडपट्टा सुरू केल्याने केकेआरचा विजय सोपा झाला. राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहत ४२ चेंडूंत ७२ धावा केल्या.
त्याआधी, कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांच्या वेगवान सलामीनंतरही मुंबईकर अपयशी ठरले. मधल्या फळीचे अपयश मुंबईला महागडे ठरले. डीकॉकही (५५) अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेच परतला. मुंबईसाठी सर्वाधिक निराशा केली ती सूर्यकुमारने. किएरॉन पोलार्ड व कृणाल पांड्या यांच्यामुळे मुंबईने दीडशेचा पल्ला पार केला. केकेआरकडून फर्ग्युसनने २७ धावांत २ बळी घेतले. प्रसिद्धनेही २ बळी घेतले. मात्र, यासाठी त्याने ४३ धावांची खैरात केली.
- नवव्यांदा मुंबई इंडियन्ससाठी सलामी देताना रोहित शर्मा-क्विंटन डीकॉक ही जोडी पॉवर प्लेमध्ये नाबाद राहिली.
- सुनील नरेनने आयपीएलमध्ये सातव्यांदा रोहितला बाद करून दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राची बरोबरी केली.
- क्विंटन डीकॉकने १६वे आयपीएल अर्धशतक झळकावले.
रोहितचा दणका!
रोहित शर्माने केकेआरविरुद्ध हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला. विशेष म्हणजे २००८ साली आयपीएल पदार्पण करताना रोहित केकेआरविरुद्धच शुन्यावर बाद झाला होता आणि गुरुवारी याच संघाविरुद्ध त्याने विक्रमी कामगिरी केली.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा
रोहित शर्मा (मुंबई) १०१५धावा, केकेआर
डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद) ९४३ धावा, पंजाब किंग्ज
डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद) ९१५ धावा, केकेआर
विराट कोहली (आरसीबी) ९०९ धावा, दिल्ली कॅपिटल्स
- नवव्यांदा मुंबई इंडियन्ससाठी सलामी देताना रोहित शर्मा - क्विंटन डीकॉक ही जोडी पॉवर प्लेमध्ये नाबाद राहिली.
- सुनील नरेनने आयपीएलमध्ये सातव्यांदा रोहितला बाद करुन दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राची बरोबरी केली.
- क्विंटन डीकॉकने १६वे आयपीएल अर्धशतक झळकावले.
- जसप्रीत बुमराहने यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक ६ वेळा तीन बळी घेण्याचा विक्रम केला.
Web Title: KKR beat the Mumbai Indians! Won by seven wickets; Venkatesh Iyer, Rahul Tripathi washed the bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.