इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020मधील सत्राला सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. त्यांच्या दोन खेळाडूंना वयचोरी प्रकरणावरून बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यात बुधवारी त्यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी धडकली. आयपीएल लिलावात त्यांनी नव्यानं दाखल करून घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची शैली अवैध ठरली आहे आणि त्याच्यावर 90 दिवस गोलंदाजी न करण्याची शिक्षा सुनावली आहे. आयपीएललाही तो मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयपीएल 2020 लिलावात कोलकातानं ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससाठी सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मोजली. आयपीएलच्या इतिहासातील कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. कमिन्ससह कोलकाता नाइट रायडर्स संघानं इयॉन मॉर्गन (5.25 कोटी), राहुल त्रिपाठी (60 लाख), वरुण चक्रवर्थी (4 कोटी), एम सिद्धार्थ (20 लाख), टॉम बँटन (1 कोटी), ख्रिस ग्रीन (20 लाख), प्रविण तांबे (20 लाख) आणि निखिल नाईक (20 लाख) यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.