Shreyas Iyer CEO KKR: IPL 2022 मध्ये नेहमीच एक अंतर्गत चर्चा रंगलेली असते ती म्हणजे फ्रँचायझी आणि त्यांचे सीईओ देखील संघांच्या प्लेइंग ११ची निवड करण्यात प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याइतका हस्तक्षेप करतात. बऱ्याच वेळा काही खेळाडूनी याबाबत बोलताना, फ्रँचायझीचे अधिकारी व सीईओ संघनिवडीत वर्चस्व गाजवतात असे अनेक वेळा सांगितले आहे. तथापि, कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने एक निवेदन जारी करून या मुद्याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे.
प्लेइंग ११ मधील बदलाबाबत बोलताना अय्यर म्हणाला की, संघ निवडण्यात प्रशिक्षकासोबतच सीईओचीही भूमिका असते. अशा परिस्थितीत खेळाडूंनाही फ्रँचायजीचा चांगला पाठिंबा मिळत राहतो. श्रेयस अय्यरच्या या विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटले होते, मात्र आता श्रेयसने खुलासा केला आहे. शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'गेल्या सामन्यात जेव्हा मी म्हणालो की सीईओ संघ निवडीसाठी मदत करतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होता की ते संघाबाहेर बसलेल्या खेळाडूंना पाठिंबा देत असतात. आणि संघाबाहेर असलेल्या खेळाडूंचे मनोधैर्य खचू देत नाहीत. माझ्या वक्तव्याचा अर्थ असा होता. पण काही जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला."
मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अँकर मुरली कार्तिकने श्रेयस अय्यरला प्रश्न विचारला होता की, "आज कोण खेळणार आणि कोण बाहेर बसणार, हे तू संघाच्या मिटींगमध्ये कसं सांगतोस?" यावर श्रेयस म्हणाला होता की, "हे खूप अवघड आहे, कारण माझीही अशी परिस्थिती असते की प्लेइंग ११ मध्ये माझी जागाही निश्चित नसते. आम्ही कोचशी बोलतो, चर्चा करतो. टीम सिलेक्शनमध्ये सीईओचाही सहभाग असतो. प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम सर्व लोकांशी बोलतो आणि प्लेइंग ११ मध्ये निवडण्याचे किंवा न निवडण्याचे कारण स्पष्ट करतो", असं श्रेयस आधी म्हणाला होता. त्यावर त्याने आज स्पष्टीकरण दिले.