Shreyas Iyer central Contract ( Marathi News ) : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी अनेक संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हाच दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. कारण, रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या फलंदाजाच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले होते आणि तो चौथ्या व पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नव्हता. पण, मुंबईने जेतेपदाचा चषक उंचावल्यानंतर ढोल ताशाच्या तालावर श्रेयस नाचताना दिसला.
हाती आलेल्या वृत्तानुसार २९ वर्षीय श्रेयस येत्या काही दिवसात कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात सामील होणार आहे. "श्रेयस लवकरच KKR कॅम्पमध्ये सामील होणार आहे. सुरुवातीच्या सामन्यांना तो मुकणार नाही,''असे सूत्रांनी सांगितले. पाठीच्या समस्येमुळे अय्यर २०२३ चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. यानंतर, त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि तंदुरुस्त झाल्यानंतर तो २०२३चा वन डे वर्ल्ड कप खेळला. रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने मुंबईच्या दुसऱ्या डावात १११ चेंडूत ९५ धावा करण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ फलंदाजी केली. KKRचा पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.
BCCI ने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वार्षिक करारातून वगळले आहे, परंतु लवकरच अय्यरच्या बाबतीत मोठा यू-टर्न बीसीसीआय घेऊ शकतात. क्रिकबझने दिलेल्या बातमीनुसार, रणजी करंडक स्पर्धेदरम्यान तो पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला होता. बीसीसीआयच्या वार्षिक करारात अय्यरचा पुन्हा समावेश केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्रानेही याला सहमती दर्शवली आणि अय्यरच्या करारावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो आणि चर्चा सुरू असल्याचे सांगितले.