इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा थरार नुकताच सुरू झाला आहे आणि काही रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सने कालच १४२६ दिवसानंतर चेपॉकवर पुनरागमन करताना शानदार विजय मिळवला. RCB ने घरच्या मैदानावर ५ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे वस्त्रहरण केले. पण, हे सर्व सुरू असताना दुखापतीचे ग्रहणही स्पर्धेला लागले आहे. गुजरात टायटन्सच्या केन विलियम्सला पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्याला माघार घ्यावी लागली. RCBचा गोलंदाज रिसे टॉपली याचाही खांदा दुखावला गेला आहे आणि त्यात आज रजत पाटीदार यानेही स्पर्धेतून माघार घेतल्याची वाईट बातमी RCBसाठी आली. आता भारताचा दमदार फलंदाज आणि कोलकाता नाइट रायरडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ruled out of the IPL 2023 & WTC final) यानेही माघार घेतल्याची बातमी येत आहे.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठिच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे वृत्त ESPN ने दिले आहे आणि तो आता संपूर्ण आयपीएल २०२३ आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल मुकणार आहे. जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि आता श्रेयस हे WTC Final खेळणार नाहीत. श्रेयस हा कोलकाता नाइट रायडर्सचा पूर्णवेळ कर्णधार आहे, परंतु तो आता शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार आहे आणि जवळपास ३ महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला मागील महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळता आले नव्हते.
त्यानंतर त्याने वन डे मालिकेतूनही माघार घेतली होती. डिसेंबरमध्येही त्याला याच दुखापतीची समस्या झाली होती आणि बांगलादेश दौऱ्यावरून त्याला माघार घ्यावी लागली होती. सध्या आयपीएलमध्ये नितीश राणा हा KKR चे कर्णधारपद भूषवत आहे आणि त्यांना पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"