मुंबईला आव्हान केकेआरचे

मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. पुढील फेरी गाठण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी मुंबईला आज कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी सज्ज व्हावे लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:12 AM2018-05-06T01:12:09+5:302018-05-06T01:20:19+5:30

whatsapp join usJoin us
KKR challenge to Mumbai | मुंबईला आव्हान केकेआरचे

मुंबईला आव्हान केकेआरचे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. पुढील फेरी गाठण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी मुंबईला आज कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी सज्ज व्हावे लागेल.
गत विजेत्या मुंबईने काल तणावपूर्ण लढतीत किंग्स पंजाब इलेव्हनवर विजय साजरा केला. पण गेल्या काही सामन्यात पराभवांचे तोंड पाहावे लागल्याने ‘प्ले आॅफ’ची त्यांची शक्यता अद्याप अधांतरी आहे. इंदूरमध्ये किंग्स पंजाबविरुद्ध कुणाल पांड्या आणि रोहित शर्मा यांनी २१ चेंडूत ५६ धावा ठोकून विजय खेचून आणला. आता वानखेडेवर केकेआरला धूळ चारण्याची वेळ आहे. मुंबईने नऊपैकी तीन सामने जिंकल्याने पाचवे स्थान मिळाले. केकेआर तिसऱ्या स्थानावर आहे. यजमान संघाला प्लेआॅफसाठी सर्व पाचही सामने जिंकावेच लागतील. मुंबईने घरच्या मैदानावर चारपैकी केवळ एकच विजय मिळविला हे विशेष.
सूर्यकुमार यादव(३४० धावा)हा धावा काढत असला तरी दुसरा सलामीवीर एविन लुईसने निराश केले. रोहित शर्मा, जेपी ड्युमिनी, ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि कुणाल यांनीही चांगले योगदान दिले, खराब फॉर्ममध्ये असलेल्या कीरोन पोलार्डला पुन्हा डच्चू मिळण्याची शक्यता असून त्याची जागा बेन कटिंग घेईल. मुंबईला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला शिस्त घालावी लागेल. जसप्रीत बुमराह, कटिंग, युवा लेग स्पिनर मयंक मार्कंडेय आणि मिशेल मॅक्लेनाघन यांना शिस्तबद्ध मारा करावा लागणार आहे.
उपकर्णधार रॉबिन उथप्पा हा मात्र लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. केकेआरचा फिरकी मारा भक्कम आहे. नारायण, पीयूष चावला आणि कुलदीप यादव यांच्याशिवाय नितीश राणा यांचे चेंडू खेळणे प्रतिस्पर्धी फलंदाजांना जड जाते. वेगवान टॉम कुर्रान, मिशेल जॉन्सन आणि शिवम मावी यांच्याकडून शिस्तबद्ध गोलंदाजी अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्सला प्लेआॅफच्या आशा जिवंत राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. तर केकेआरदेखील विजय मिळवून गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवण्यास उत्सुक असेल.


दिनेश कार्तिक हा केकेआरचे शानदार नेतृत्व करीत आहे. चेन्नईवर सहा गड्यांनी विजय नोंदविताच संघ तिसऱ्या स्थानी दाखल झाला. सलग तिस-या विजयासह हा संघ प्ले आॅफमधील स्थान बळकट करणार आहे. कार्तिकने स्वत: २८०, ख्रिस लीन २६० आणि आंद्रे रसेल याने २०७ धावा केल्या. सुनील नारायण आणि शुभमान गिल हे देखील धावा काढण्यात योगदान देत आहेत.

Web Title: KKR challenge to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.